टाळेबंदीमुळे महासभा घेण्यावर आलेली बंधने लक्षात घेऊन ३० एप्रिल रोजी महासभा ‘झूम अ‍ॅप’वर महासभा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या महासभेसाठी विषयपत्र तयार करण्याच्या सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगरसचिवांना दिल्या आहेत.

महापालिकेची महासभा १५ मार्च रोजी झाली होती. त्यानंतर करोना संसर्ग टाळण्यासाठी  गर्दी करण्यावर सभा, कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर बंधने आली. या बंधनामुळे १५ मार्चनंतर महासभा बोलावत आली नाही. दोन महासभेतील कालावधी ६० दिवसापेक्षा अधिक असू नये असा नियम आहे. अन्यथा आपोआपच महापौरपद धोक्यात येऊ शकते. हे  लक्षात आल्यावर महापौर गीता सुतार यांनी महासभा बोलावण्याबाबत  लेखी पत्र आयुक्तांना दिले.

याबाबत सोमवारी आयुक्त कापडणीस आणि महापौर श्रीमती सुतार यांच्यामध्ये चर्चा होऊन गर्दी टाळण्यासाठी काय करता येउ शकेल, यावर चर्चा झाली. या चच्रेतून झूम अ‍ॅपद्बारे महासभा घेण्याचा प्रस्ताव समोर आला. आयुक्त व महापौर यांच्यामध्ये झालेल्या  चच्रेनुसार ३० एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने विशेष महासभा घेतली जाणार आहे.  यामध्ये सर्व नगरसेवक व अधिकारी यांना झूमद्वारे एकत्र आणत विशेष महासभा घेतली जाणार आहे. ३० एप्रिल रोजी ही ऑनलाइन सभा घेण्याचे नियोजन सुरू झाले असून या विशेष सभेत मनपा क्षेत्रातील करोना उपाययोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. यासाठी झूमद्वारे नगरसेवक आपल्या घरातून तर अधिकारी हे आपल्या कार्यालयातून या विशेष सभेत सहभागी होणार आहेत. याचबरोबर महापौर, उपमहापौर, आयुक्त आणि नगरसचिव हे मनपा मुख्यालयात बसून या सभेचे कामकाज झूमद्वारे पाहणार आहे. या टेक्नोसेव्ही महासभेसाठी विषयपत्र तयार करण्याच्या सूचना नगरसचिवांना आयुक्तांनी दिल्या आहेत.