MP Narayan Rane praised both mla sons Nitesh Rane, Nilesh Rane : नारायण राणे यांच्याबरोबर त्यांची दोन मुले नितेश आणि निलेश राणे हे राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे हे तीनही नेते सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. यादरम्यान माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर सभेत त्यांचे पुत्र आणि आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

“निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार म्हणून निवडून आले म्हणून त्यांचा सत्कार आहे. नितेश राणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. दोन चिरंजीव आमदार आणि वडील खासदार हे देशातील एकमेव वस्तुस्थिती असेल. मा‍झ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, तो यासाठी की दोन्ही पुत्र कर्तृत्ववान निघावे हे भाग्य मला मिळालं आहे. मुलांचं कौतुक वडील करतात आहेत असं नाही. त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो आहे,” अशा शब्दात नारायण राणे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे कौतुक केले आहे.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले की, “दोन्ही (निलेश आणि नितेश राणे) चांगले शिकले, मला अपेक्षित होतं ते शिक्षण त्यांनी घेतलं. निलेश, नितेश दोन्ही परदेशात गेले. निलेश १५ वर्षांचा असताना न्यूयॉर्कमध्ये गेला. तो एमकॉम, पीएचडी झाला त्यानंतर तो खासदार झाला. नितेश अमेरिकेतून लंडनमध्ये गेला, एमबीए केलं आणि भारतात आला. दोघांनाही येथे येऊन राजकारणात येण्याची मोकळीक नव्हती. आल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी निलेशला एका ऑफिसमध्ये घेऊन गेलो, चावी दिली आणि हे व्यवसाय तू सांभाळ असं सांगितलं. नितेश आला त्याला दुसरा व्यवसाय सांभाळायला दिला.”

कोणाच्या खिशात हात…

“तुम्ही व्यवसाय आणि राजकारण केलं तर माझी काही हरकत नाही, फक्त राजकारण नाही”, असे आपल्या दोन्ही मुलांना सांगितल्याचेही ते म्हणाले. “आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करत आहोत. त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालाण्याची गरज नाही” असेही नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले.

दोन्ही मुलांची घमेंड

“मी १९९० साली राजकारणात आलो. आजतगायत एकाही कॉन्ट्रॅक्टरने सांगावं की राणेंना पैसे नेऊन दिले, किंव निलेश, नितेश आम्हाला कोणाकडे जायची गरज नाही. आज आम्ही जे आहोत ते स्व:कर्तृत्वाने आहोत. त्यामुळे मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड आहे. मी सांगितलं ते ऐकलं, त्याचं अनुसरण केलं आणि पालनही करत आहेत. फार कमी क्षण येतात की वडील आपल्या मुलांचं कौतुक जाहीर सभेत करतात. असा काळही नाहीये, पण मी त्याला अपवाद असेल. या दोघांबद्दल मला अभिमान आहे,” असेही नारायण राणे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.