आज रामनवमीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा भक्तीत रंगल्या आहेत. नवनीत राणांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात नवनीत राणांनी भगवा गमछा परिधान केला आहे. तसेच, बुलेटवर बसून जय श्रीरामचा नारा देताना राणा दिसत आहेत. राणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत नवनीत राणांनी डोक्याला भगवा गमछा बांधला आहे. तसेच, काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेटची स्वारी केली आहे. ‘ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम…’ असं नवनीत राणांनी व्हिडीओत म्हटलं आहे.
दरम्यान, ६ एप्रिलला हनुमान जयंती आणि नवनीत राणांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत १११ फुट उंचीची भव्य हनुमान मूर्तीही उभारण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाचं भूमीपूजन दिवशी केलं जाणार आहे.
हेही वाचा : सातारा : लोकप्रतिनिधींना अपात्र करण्याचे भाजपकडे नवे हत्यार : शशिकांत शिंदे
त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बॅनर्सही लावण्यात आले आहेत. या बॅनरवर हिंदू ‘शेरनी’ असा नवनीत राणांचा उल्लेख केला आहे. बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांचेही फोटो आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याचाही फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे.