खासदार नवनीत राणा यांना भाजपाने अमरावतीमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे. भाजपाची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली, या यादीत नवनीत राणा यांचे नाव जाहीर करण्यात आले. यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात प्रवेशदेखील केला. मात्र, नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला आहे. “नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. यानंतर आज नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

“गेल्या पाच वर्षांपासून आम्ही एनडीएचे काम करत आलो आहोत. भाजपाच्या नेत्यांनी माला उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते. यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० पारचा नारा दिलेला आहे. त्यामुळे या चारशेपैकी एक अमरावतीही असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नासाठी आम्ही सर्वजण मिळून काम करणार आहोत. त्यासाठी अमरावतीकरांचा आशीर्वाद कायम असेल. “

हेही वाचा : बच्चू कडू आक्रमक! “नवनीत राणांना पाडणार, स्वाभिमानाचा गुलाल उधळणार, भाजपाने…”

“देशाच्या आणि अमरावतीच्या विकासासाठी सर्वांनी एका मंचावर येऊन काम केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा पूर्ण करण्यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न राहिल. त्यासाठी आम्ही मिळून काम करू. वेळ जसजसा जाईल, तसतशा सर्व गोष्टी आपल्याला पाहायला लागतील. मला एवढा विश्वास आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न ज्यांना पूर्ण करायचे आहे, ज्यांना अमरावतीचा विकास करायचा आहे, ते मतभेद विसरून नक्की एका मंचावर येऊन साथ देतील”, असे नवनीत राणा म्हणाल्या.

बच्चू कडू काय म्हणाले होते?

नवनीत राणा यांना अमरावतीमधून भाजपाने लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “नवनीत राणा यांना तिकीट दिले ही भाजपाची मर्जी. उमेदवारी दिली म्हणजे विजयी होणे असे नाही. उमेदवारी देऊन विजयी होता येते का? तसे झाले नाही तर चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणा यांना पाडता येते का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो, अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे”, असे बच्चू कडू म्हणाले होते.