मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर आता शिवसेना खासदारही त्याच्यासोबत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचा दावा शिंदे गटातील आमदारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर खासदार गावित हे शिंदे गटात सामिल झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता राजेंद्र गावित यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदे गटात प्रवेश केला नसल्याचा खुलासा पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची आपण फक्त सदिच्छा भेट घेतल्याचे राजेंद्र गावित यांनी म्हटले आहे.
“माझ्या मतदारसंघातील एमएमआरडीए आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक गावांसोबत रस्ते जोडलेले नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. मी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला नाही. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने कोणत्याही पक्षातील लोकप्रतिनिधी त्यांना भेटू शकतात. माझ्या मतदार संघातील कामे करुन घेण्यासाठी त्यांना भेटलो,” अशी प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी टिव्ही९ मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.
“माझ्या मतदारसंघातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. पण मी फक्त सदिच्छा भेट देण्यासाठी गेलो होतो. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे पत्र आम्ही खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिले होते. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी मिळाली आणि उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पद्धतीने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन,” असेही राजेंद्र गावित म्हणाले.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची ट्विटरद्वारे माहिती दिली. “वसई – विरार मनपातील ५, विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक, तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी युती सरकारला आपला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते,” असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
मात्र मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक लोक भेटायला येत असतात. राजेंद्र गावित फक्त मला भेटायला आले होते. ते अजून शिंदे गटात आलेले नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.