Supriya Sule On Tanisha Bhise Death Case : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही दिवसांपूर्वी गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर या प्रकरणाची चौकशी वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. आता या प्रकरणावर ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. मात्र, हा अहवाल समोर आल्यानंतर त्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
दरम्यान, ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. ससून रुग्णालयाच्या समितीच्या अहवालावर बोलताना तो अहवाल जाळून टाकला पाहिजे, असं सुप्रिया सुळेन यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरणासंदर्भात ससून रुग्णालयाचा अहवाल समोर आला असून त्या अहवालात रुग्णालयाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना विचारला. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मला विश्वासच बसत नाही की असा काही अहवाल येऊ शकतो? खरं तर मी प्रशांत जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते) यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं कौतुक करते. तसेच मी त्या अहवालाचा निषेध करते”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
“मला असं वाटतं की तो अहवाल जाळून टाकला पाहिजे, कोणाच्या तरी घरातील एक लेक गेली, मुलांची आई गेली आहे. मग एवढा चुकीचा अहवाल कसा येऊ शकतो? हे धक्कादायक आहे, असंवेदनशील आहे. आम्ही तो अहवाल स्वीकारणार नाही. मला असं वाटतं तो अहवाल (ससून रुग्णालयाच्या समितीचा अहवाल) कचऱ्याच्या डब्यात नाही, तर तो अहवाल जाळून टाकला पाहिजे. जोपर्यंत त्या माऊलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.