वाई : तुतारी हे चांगले चिन्ह आहे. त्या पक्षाचे नेते पण मोठे आहेत. प्रत्येक नेतृत्वाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. त्यामुळे उगाचं काही अर्थ लावू नका, तुतारीचे काय त्या आमच्याही वाड्यात वाजतात, अशी राजकीय टोलेबाजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त उदयनराजे यांनी सातारा जिल्हा कार्यालयात भेट दिली. त्यावेळी कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलते झाले. आपण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहात काय असे विचारले असता त्यांनी तुतारी या शब्दावर कोटी केली.

उदयनराजे म्हणाले, मी राजकारणापेक्षा समाजकारणावर विश्वास ठेवतो आणि आजपर्यंत वाटचाल तत्वाने केली आहे. सर्व राजकीय पक्ष छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण मी तत्वनिष्ठ आहे. छत्रपतींची ध्येयधोरणे भाजप पक्ष अंमलात आणत आहे. तुतारी ही मंगल प्रसंगी वाजवितात. ज्या पक्षाचे ते चिन्ह आहे ते ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. पण तुतारी वाद्याचं म्हणाल तर ती आमच्या वाड्यावरसुध्दा वाजते.

आणखी वाचा-मतदानाच्या दिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी… कुठे आणि कधी असणार सुट्टी?

भाजपकडून उमेदवारीचं निश्चितीचं काय झाले या प्रश्नांवर तुम्ही फिरून फिरुन हाच प्रश्न का विचारता, असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. कुरिअरला तिकिट लावून ते पार्सल करतात तसा मी सोपा नाही. काही गोष्टीची वेळ आणि पद्धत ठरलेली असते, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उदयनराजे यांनी पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर पक्ष ध्वजाचे ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला. तसेच नमो ऍप च्या माध्यमातून पक्षास देणगी पाठवली व उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते किशोर गोडबोले व रवींद्र आपटे यांना सन्मानित केले. यावेळी संतोष कणसे, मनीषा पांडे, पंकज चव्हाण, धनंजय पाटील, मनीष महाडवाले, राहुल शिवनामे, डॉ सचिन साळुंखे, शहराध्यक्ष विकास गोसावी, रवींद्र लाहोटी, अमित भिसे, वैष्णवी कदम, रीना भणगे, अश्विनी हुबळीकर, कल्पना जाधव, उज्वला खंदारे, रोहिणी क्षीरसागर आदी पदाधिकारी उपस्थित होते