पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील हर्षल भामरे हे राज्यातून आणि मागासवर्गीयातून प्रथम आले, तर महिलांमध्ये कोल्हापुरातील पद्मश्री दाईंगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

आयोगाने लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण ४२८ पदांसाठी ही परीक्षा घेतली होती. मराठीच्या ३९२, तर इंग्रजीच्या ३६ पदांसाठी ही परीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. अपंगांसाठी राखीव असलेल्या पदांसाठीच्या पात्र उमेदवारांची प्रमाणपत्रे वैद्यकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अटीवर शिफारस करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सहायक अभियंता, विद्युत गट ब, या पदासाठी झालेल्या महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील धनश्याम रामगडे हे राज्यातून आणि मागासवर्गीयातून प्रथम आले आहेत. याची पूर्वपरीक्षा ८ जुलै २०१८ रोजी आणि मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. तर मुलाखती एप्रिलमध्ये घेण्यात आल्या.