संदीप आचार्य
राज्यात म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत असताना खाजगी रुग्णालयांकडून यावरील उपचारापोटी वाट्टेल तशी बिले आकारली जात आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच एका सनदी अधिकाऱ्याच्या भावालाच तब्बल ३९ लाख रुपयांचे बिल भरायला सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अवघ्या २४ तासात अभ्यास करून म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारांचे दर निश्चित केले असून त्यापेक्षा जास्त दर आकारल्यास संबंधित रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याबरोबरच फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. याबाबतच्या अधिसूचनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यतेची मोहर उमटवली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्द्यावर चर्चा!
करोनाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशीचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. आजघडीला राज्यात जवळपास पाच हजाराहून अधिक रुग्ण असून त्याच्या उपचारांसाठी किमान नऊ ते बारा लाख रुपये खर्च येतो. यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनचाच खर्च काही लाखांमध्ये असून शस्त्रक्रिया व रुग्णालयीन अन्य उपचारांमुळे हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहे. खासगी पंचतारांकित रुग्णालयात या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना २५ लाखाच्या पुढे बिल आकारण्यात येत असल्याच्या अनेक बाबी मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही मंत्र्यांनीच मांडल्या होत्या.
मंत्रालयातल्या अधिकाऱ्याच्या भावाला ३९ लाखांचं बिल!
दरम्यान, मंत्रालयातील एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या भावालाच एका पंचतारांकित रुग्णालयाने ३९ लाख रुपये उपचारापोटी भरण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी म्युकरमायकोसिसच्या उपचाराचा खर्च निर्धारित करण्याचा मुद्दा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडला. त्यानंतर अवघ्या २४ तासात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी उपचाराच्या सर्व खर्चांचा तपशीलवार अभ्यास करून उपचारांचे दर निश्चित करून तसा प्रस्ताव सादर केल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
३१ जुलैपर्यंत अध्यादेश लागू
यापूर्वीच सरकारने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी डॉ. सुधाकर शिंदे यांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशीलवार आढावा घेतला होता. दरनिश्चीती करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. याबाबत जारी झालेली अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील. संबंधित रुग्णालयांना पूर्वलेखापरिक्षित बिल देणे बंधनकारक असून जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांची भरारी पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. यात दोषी आढळल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई केली जाईल असे डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.
नेमकी कशी असेल वर्गवारी आणि दरनिश्चिती? वाचा सविस्तर!
यापूर्वी आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवताना खाटांचे दर, रुग्णालयीन उपचारांचे दर तसेच पीपीइ किट व मास्क यांचेही दर निश्चित केले होते. तथापि अनेक खासगी रुग्णालयांकडून याचे वारंवार उल्लंघन होत असून राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रात याची महापालिका आयुक्त तसेच जिल्हापातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी होत नसल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच तीन दिवसांपूर्वी एका बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच जास्त बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याचा मुद्दा काही मंत्र्यांनी उपस्थित केला होता.
दरनिश्चितीसाठी वर्गवारी!
म्युकरमायकोसीसवरील उपचाराचे दर याप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत. वॉर्डमधील अलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण यांचा समावेश. मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.
व्हेंटीलेटरशिवाय आयसीयू व विलगीकरण: अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये
व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण : अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये
अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र ( मीरा भाईंदर मनपा, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर मनपा क्षेत्र, अंबरनाथ, कुळगाव बदलापूर,पनवेल महापालिका), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर ( नागपूर मनपा, दिगडोह, वाडी) यांचा समावेश आहे.
ब वर्ग शहरांमध्ये नाशिक, अमरावती, औरंगाबाद, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली यांच्यासह सर्व जिल्हा मुख्यालये यांचा समावेश आहे. ‘क’ वर्ग गटात ‘अ’ आणि ‘ब’ गटाव्यतिरिक्त इतर शहरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.
या आजारावरील उपचारांचे दर आता सरकारने निश्चित केले असले तरी त्याची अंमलबजावणी कशी करणार? असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.