सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात विमानतळ झाल्यावर रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा असलेल्या बहुचर्चित चिपी विमानतळावर विमान सेवा देण्यासाठी तारतम्य बाळगले जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून चिपी ते मुंबई विमानसेवा बंद झाली आहे. ती सुरू झाली नाही. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असूनही या विमानतळावरील सेवेत सुधारणा झाल्याचे दिसून येत नसल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त होत आहे.

अलाईन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा बंद होऊन तीन महिने झाले. त्या पाठोपाठ फ्लाय ९१ च्या हैदराबाद व बेंगलोर सेवाही बंद झाल्या. अलीकडेच सुरू झालेली पुणे ते चिपी ही आठवड्यातून दोन दिवस सुरू असलेली विमानसेवा आता अनियमित व वारंवार लगतच्या गोवा राज्यातील मोपा विमानतळावर वळविण्यात येत आहे.

चिपी विमानसेवा बंद होऊ लागल्याने राजकीय कलगीतुरा रंगला. मात्र मुंबई विमानसेवा सुरू झाली नाही. बहुचर्चित चिपी विमानतळ अशामुळे बंद पडण्याची भिती प्रवाशांना वाटते. केंद्र व राज्य सरकार भाजपचे असूनही चिपी विमानतळावर दुर्लक्ष कसा काय होतोय? असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे.प्रत्यक्षात तीनशे कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या विमानतळावर थोड्याशा खराब हवामानातही विमान उड्डाण करण्यासाठी सक्षम सिग्नल यंत्रणा उभी राहिलेली नाही हे विमानसेवा सुरू झाल्यापासून वेळोवेळी समोर आले आहे.

कॅट १ ते २, ILS प्रिसिजन अप्रोच लँडिंग सिस्टीम यासारख्या आधुनिक सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतरच खराब हवामानात व रात्री उड्डाणे शक्य होतात. परंतु चिपी विमानतळावर अशी यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही, असे बोलले जात आहे. रस्ता बांधकाम व टोल वसूल करणाऱ्या आयआरबी कंपनीने हा विमानतळ विकासीत केला आहे. नौदल दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मान्यवरांचे स्वागत चिपी विमानतळावर करण्यात आले होते. तेव्हा यंत्रणा सक्षम ठेवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात वेळोवेळी प्रवाशांची गैरसोय झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारने रस्ता, पाणी अशा विविध पातळ्यांवर सेवा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. पण त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गोवा राज्यात मोपा आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू झाल्यापासून चिपी विमानसेवेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केंद्र, राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर विमान सेवा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेऊन लवकरच विमानसेवा सुरू होईल असे पहायला हवे असे पर्यटक, प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.