रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ वाणी पेठ येथे गॅस टँकर एका अवघड वळणार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात गॅस टँकर २५ फुट दरीत गेल्याने टँकर मधून गॅस गळती सुरु झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आजूबाजुच्या सर्व घरातील लोकांना रात्री सुरक्षितस्थळी हालविण्यात आले. या अपघातामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. तसेच ठप्प झालेली महामार्गावरील वहातूक १५ तासांनंतर सुरळीत करण्यात पोलीस व बचाव पथकाला यश आले आहे.

जयगड येथून कोल्हापुरच्या दिशेने ८० टन एलपीजी गॅस भरून जाणारा गॅस टँकरची हातखंबा वाणी पेठ येथे नियंत्रण सुटल्याने शाळेजवळ पलटी झाला. अपघातग्रस्त गॅस टँकर मधून गळती सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक लोकांनी व रत्नागिरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून गावातील सर्व लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. टँकर मधून होणारी गॅस गळती रोखण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी येथून बचाव पथक बोलविण्यात आले. या पथकाने पोलिसांच्या मदतीने होणारी गॅस गळती थांबवली. काही वेळाने दुस-या गॅस टँकरला गॅस स्थलांतर करण्यासाठी पाचारण करण्यात आले. हा गॅस स्थलांतरीत करण्याचे काम बचाव पथकाकडून करण्यात आल्यावर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त गॅस टँकरला बाहेर काढण्यात यश आले.

रात्री झालेल्या या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरील वहातूक पुर्ण ठप्प झाली होती. महामार्गावर वहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तसेच या मार्गावरील वहातूक बावनदी मार्गे देवरूख साखरपा तर काही वहातूक लांजा देवधे मार्गे वळविण्यात आली. या महामार्गावरील वहातूक सुरळीत करण्यात १५ तासांनंतर बचाव पथकाला यश आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सांगितले की, गॅस टँकर मधील गॅस धोकादायक असून त्याचा स्फोट होण्याची भीती होती. त्यामुळे येथील गावकऱ्यांच्या जीवितास धोका असल्याने येथील नागरिकांना आजूबाजूच्या परिसरात हलवण्यात आले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातानंतर जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.