चिपळूण : गणेशोत्सव काळात होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीची रंगीत तालीम चाकरमान्यांनी दहीहंडीच्या दिवशी अनुभवली. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाला पुढे जायची घाई असल्यामुळे दोन्ही मार्गिकेवर एकाच दिशेने वाहने धावत होती, त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली.
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या रेल्वे, एसटी फुल्ल आहेत. तर खासगी गाड्यांचे तिकीट सर्वसामान्य कोकणवासीयांना परवडत नाही. तरीही ‘कोकण म्हणजे गणेशोत्सव आणि गणेशोत्सव म्हणजे कोकण’ ही परंपरा कायम ठेवण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात येतोच. नारळी पौर्णिमेनंतर ही तयारी वेगाने सुरू होते. १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, १६ ऑगस्टला दहीहंडी आणि १७ ऑगस्टला रविवार असल्यामुळे सलग तीन सुट्ट्या जोडून आल्या. त्यामुळे चाकरमान्यांसह अनेक पर्यटक या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले होते. खेड, चिपळूण संगमेश्वर या भागातील महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महामार्ग खराब असल्याने अपघाताची भीती चाकरमान्यांना असून, कोंडी तर आमच्या पाचवीलाच पुजली आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सद्य स्थितीत असलेली वाहतुक कोंडी हा कोकण वासियांसाठी गंभीर प्रश्न बनला आहे. येणा-या गणेशोत्सव कालावधीत अशीच वाहतुक कोंडी राहिल्यास चाकरमान्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधीच ठेकेदारांवर आणि नेत्यांवर विलंबाबद्दल जबाबदारी निश्चित करावी. प्रत्येक टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करावे आणि पाळावे. जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. वार्षिक नव्हे, मासिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करावा. अपघातात बळी गेलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर करावी. तसेच गणेशोत्सवापूर्वी प्राथमिक मार्ग टप्पे युद्धपातळीवर पूर्ण करावेत, अशा स्वरुपाची मागणी जोर धरु लागली आहे.
रखडलेल्या चौपदरीकरणाचा कालावधी – १७ वर्ष
१७ वर्षात झालेले अपघात : १० हजारहून अधिक
मृत्युमुखी पडलेले प्रवासी : ४ हजार ५००
मुंबई-गोवा महामार्गासाठी २०१६, २०१८, २०२०, २०२३, जून २०२५ या वेळोवेळी दिलेल्या ‘डेडलाईन’ केवळ घोषणा ठरल्या. प्रत्यक्षात महामार्ग अजूनही खड्ड्यांनी वेढलेला आणि प्रवाशांच्या मृत्यूच्या घटनांनी झाकोळलेला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पाहणी, दौरे काढून आश्वासने दिली जातात. पण, वर्षभर प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना अपघात, वाहतूक कोंडी या समस्यांबरोबरच वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी पडावे लागते. – अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती