Bombay High Court on Maratha Reservation Protest in Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायधीश चंद्रशेखर व आरती साठे यांच्या खंडपीठासमोर मुंबईतील आझाद मैदानात चालू असलेल्याआंदोलनाबाबत सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात आलेलेया आंदोलनामुळे मुंबईकरांना झालेल्या गैरसोयींवरील जनहित याचिकेवर सुनावणी करताना, मंगळवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. राज्य सरकार आंदोलनाचे ठिकाण जबरदस्तीने रिकामे करू शकले असते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सुनावणीदरम्यान राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आणि सांगितले की पोलीस उच्च न्यायालयाच्या आदेशाबद्दल घोषणा करत आहेत आणि त्यांनी बॅनर आणि पोस्टर्स लावले आहेत.

मुंबईतून मराठा आंदोलकांना घालवण्याच्या बाबतीत न्यायालयात माहिती देताना सुनावणीवेळी राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील म्हणाले की, “आम्ही विविध उल्लंघने लक्षात आणून देत जरांगे यांनी इतर आयोजकांना नोटीस देखील बजावली. ते एक खूप प्रभावशाली व्यक्ती असल्याने ते खऱ्या अर्थाने लेखी आणि तोंडी विचारणा करून त्यांच्या समर्थकांना मुंबई सोडण्यासाठी सांगू शकतात, त्यानंतर ते नक्कीच सोडून जातील. रात्रभर पोलिसांनी आंदोलन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा काही परिणाम झाला. पण जेव्हा जरांगे लोकांना आवाहन करतील तेव्हाच मोठा परिणाम होईल.”

यावर न्यायलयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले की, “म्हणजे मग तुम्ही त्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहात का? तुम्ही आमचे आदेश का लागू करू शकत नाहीत? हे तुमचे कर्तव्य आहे…सहभागींची संख्या ५,००० वरून एक लाखाहून अधिक झाली हे दाखवून देत तुम्ही न्यायालयाकडे का आला नाहीत… आम्हाला तुमच्या विरोधात देखील आदेश द्यावे लागतील… तुम्ही सर्व उपाय करू शकला असतात… तुम्ही बळाचा वापर करून ते रिकामे करू शकला असतात… हा खूप गंभीर मुद्दा आहे… आम्ही तुमच्या कारवाईवर खूप खूप नाराज आहोत… आम्ही आमच्या आदेशांचे उल्लंघन करण्याची परवानगी देऊ शकतो का?” असा सवाल न्यायालयाने यावेळी सरकारला केला. न्यायालयाने यापूर्वी जरांगे आणि इतर आंदोलकांना आझाद मैदान ताबडतोब रिकामे करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, सदर प्रकरणाची सुनावणी उद्या (बुधवार, ३ सप्टेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. यासाठी मनोज जरांगे यांच्या वकिलांनीच न्यायालयाकडे विनंती केली होती.