सध्या संपूर्ण देशात करोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वस्तरांमधून जनजागृती केली जात आहे. तसंच पोलीस, डॉक्टर, सफाई कमागार आणि इतर अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. तरी देखील लॉकडाउनच्या काळात काही लोक बाहेर फिरताना दिसत आहे. अशा लोकांसाठी महाराष्ट्र पोलीस विविध क्लुप्त्या वापरुन घरात राहण्याचा संदेश देत आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांनी अनोख्या पद्धतीनं जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे.

“आम्ही सांगतो ना…सध्या घरी बसणं हेच पुंण्याचं काम आहे! लॉकडाउन संपेपर्यंत हे पुंण्याचं काम करूया, ‘मुंबई-पुण्याचं’ नाही,” अशा आशयचं ट्विट महाराष्ट्र पोलिसांनी केलं आहे. सध्या ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांनी सुरू केलेली ही जनजागृती संर्वांच्याच पसंतीस उतरत आहे.

यासोबत त्यांनी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतले दिग्गज कलाकर प्रशांत दामले यांचं ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या गाण्याचा फोटोही शेअर केला आहे. त्यासोबतही पोलिसांनी एक संदेश लिहिला आहे. ‘मला सांगा सुरक्षा म्हणजे नक्की काय असते?, काय पुण्य असलं की ती घसबसल्या मिळते,’ असं त्यावर लिहिलं आहे.