महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये जी अतिवृष्टी होते आहे, त्यासंदर्भात आपल्या राज्याच्या कंट्रोल रुमवरुन राज्यात संवाद साधला. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ऑनलाइन उपलब्ध होते. मागचे दोन दिवस काही भागांमध्ये अतिवृष्टी होते आहे. तसंच १८ ते २१ या दिवसांमध्येही १५ ते १६ जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट आहे. लोकांची गैरसोय होणार नाही याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

आम्ही कोकण भागात कुंडलिका, वसिष्ठी नदीच्या पतळीवर नजर ठेवली आहे. आवश्यक ते प्लानिंगही करण्यास सांगितलं आहे. नाशिक विभागात तापी आणि हतनूरला मोठ्या प्रमाणात पाणी रावेरमध्ये शिरलं आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचं नुकसान, प्राण्याचं नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात सगळ्या धरणांमध्ये पाणी आहे, पण धरण इशारा पातळीवर नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपण छत्रपती संभाजीनगर भागात पाहिलं तर बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी पूरस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडच्या भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. पाच लोक बेपत्ता झाले. १५० हून अधिक प्राण्यांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी एसडीआरएफ, एनडीआरएफची टीम कार्यरत आहेत. रेड आणि अलर्ट असेल त्या भागांमध्ये लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडलं पाहिजे. धबधबे, तलाव या ठिकाणी उत्साहाने जाण्याची इच्छा अनेक तरुणांना असते. असं वाटणं काही गैर नाही. पण सावधगिरी बाळगली पाहिजे असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

मुंबईत दहा ते बारा तास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला-मुख्यमंत्री

पावसाच्या जोरामुळे किंवा इतर काही समस्यांमुळे ट्रेन लेट आहेत. पण ट्रेन्स पूर्णपणे कुठेही थांबलेलल्या नाहीत. मुंबईत पुढच्या दहा ते बारा तास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात आपण शाळांना सुट्टी दिली आहे. तसंच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही लवकर घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. आज तीन मीटर तर उद्या चार मीटर लाटा भरतीमुळे उसळलतील असा अंदाज आहे. लोकांना मी आवाहन करु इच्छितो लाटा पाहण्यासाठी वगैरे य़ेऊ नका. मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, त्यामुळे समुद्राची पातळी आणि नाल्यांची पातळी सारखी असेल. पाणी पंपिग करावं लागणार आहे त्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे. आज जे काही अलर्ट येतील त्यानुसार उद्या शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.