माझे बाबा आदरणीय मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणा-या व त्यांना गमावून सैरभैर झालेल्या लाखो लोकांना व कुटूंबाला धीर देण्याचं अतिशय कठीण शिवधनुष्य मी पेलत आहे. साहेब हयात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. कृपया साहेबांच्या मृत्यूच्या चौकशीचे भांडवल करू पाहणा-यांकडे जनतेने दुर्लक्ष करावे आणि त्यांच्या विधानांना बळी पडू नये, असे आवाहन आ. पंकजा मुंडे-पालवे यांनी केले आहे.
दुःखी मनाचा आयुध म्हणून वापर करू नये. त्यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते पक्षाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग आणि पक्षश्रेष्ठींशी बोलले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पुर्ण विश्वास आहे. संसदेच्या पाय-यावर नतमस्तक होणारा पंतप्रधान किती संवेदनशील असेल याबद्दल मला खात्री आहे. साहेबांच्या मृत्यूसंबंधातील जनमानसात असणा-या आक्रोशाला ते नक्की दिशा देतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे कृपया मुंडे साहेबांवर प्रेम करणा-यांनी नियंत्रण सोडू नये असे आवाहन आ. पालवे यांनी केले आहे.