भारतीय जनता पार्टीने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. पण भाजपानं असं अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता मुरजी पटेल यांनी स्पष्ट विधान केलं आहे. आमच्यासाठी पद महत्त्वाचं नसतं, आमच्यासाठी अंधेरीतील जनता महत्त्वाची आहे, असं विधान पटेल यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

यावेळी मुरजी पटेल म्हणाले, “अंधेरी पोटनिवडणुकीतून अर्ज मागे घेतल्यानंतर मी प्रत्येक मतदारांशी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर आम्ही लगेच कामाला लागलो. आमच्यासाठी पद हे महत्त्वाचं नसतं, आमच्यासाठी अंधेरीची जनता महत्त्वाची आहे. अंधेरीच्या नागरिकांना भेडसवणारी प्रत्येक समस्या महत्त्वाची आहे. म्हणून अर्ज मागे घेतल्यापासून मी कामाला लागलो आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेठी घेण्याचं काम सुरू केलं आहे.”

पक्षानं घेतलेल्या निर्णयावर तुम्ही नाराज आहात का? असं विचारलं असता मुरजी पटेल म्हणाले, “मी अजिबात नाराज नाही. पक्षानं योग्य विचार करून हा निर्णय घेतला आहे. मी पक्षाबरोबर आहे. पक्षानं जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे. मी अजिबात नाराज नाही.”

हेही वाचा- बीडच्या पालकमंत्री व्हायला आवडेल का? पंकजा मुंडेचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्याने तुम्हाला विधान परिषदेवर संधी देण्याबाबत चर्चा सुरू आहे, याबाबत विचारलं असता पटेल म्हणाले की, असं काहीही नाही. मला विधान परिषदेवर संधी देण्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. आमच्या पक्षाचं एकच धोरण आहे, काम करा… बाकीची पर्वा करून नका. निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्याने नाराज झालेल्या समर्थकांची समजूत काढली आहे, ते सगळे आता जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे मतदारांना मी एवढंच सांगू इच्छितो की, मी मागील २२ वर्षांपासून तुमची सेवा करत आहे. यापुढे यापेक्षा अधिक ताकदीने तुमची सेवा करत राहील.