सांगली : दारूसाठी पैसे मागत, हल्ल्याची धमकी दिल्याबद्दल एकाचा खून झाल्याची, तर एका तरुणाला मारहाण करण्याची अशा दोन स्वतंत्र घटना मिरज तालुक्यात घडल्या. यातील पैशासाठी तगादा लावणाऱ्याचा खून करणाऱ्याला कुडाळ (जि. सिंधूदुर्ग) येथून अटक करण्यात आली आहे. तर, दारूच्या पैशासाठी मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी शनिवारी दिली.
मालगाव (ता. मिरज) येथे १० जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास बहादूर चाँद देसाई (वय ५५) यांचा काठीने बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मृत देसाई यांनी अनोळखी व्यक्तीला दारूसाठी पैसे मागितले होते. पैसे न दिल्यास ब्लेडने मारण्याची धमकी दिली होती. या कारणावरून त्याने काठीने केलेल्या मारहाणीत देसाई यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने संशयिताचा शोध केला असता संशयित कुडाळ (जि. सिंधूदुर्ग) येथे असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणाहून संशयित इब्राहिम अमीनसाब मुजावर (वय ४०, रा. माळी गल्ली, मिरज) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे निरीक्षक श्री. सिद यांनी सांगितले.
दुसऱ्या प्रकरणात एरंडोेली (ता. मिरज) येथे मसोबा मंदिराजवळ दारूच्या पैशासाठी महाविद्यालयीन तरुण सूरज धुळाप्पा मगदूम याला तिघांनी रस्त्यात अडवून ५ हजार ८०० रुपयांना लुटले होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी हर्षद मजगे (वय २८), अंकुश गावडे (वय ३५) आणि शीतल पाटील (वय ३५, सर्व रा. एरंडोली) या तिघांना शनिवारी अटक केली आहे.
लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या
मागासवर्गीय असल्याच्या कारणातून लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना तोंडोली (ता. कडेगाव) येथे घडली. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शनिवारी मिळाली.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा तुपे (वय १९) या तरुणीने ८ जुलै रोजी राहत्या घरात आत्महत्या केली. तिचे आणि संशयित आरोपी सचिन तवर यांचे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करण्याच्या तयारीत असताना तरुणाने तू मागासवर्गीय असल्याने घरातील लोक लग्न मान्य करणार नाहीत, असे सांगून लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तरुणीने आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.