शहरालगतच्या पाथर्डी शिवारात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील आई व मुलगा यांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. पाथर्डी शिवारातील गौळाणे रस्त्यावरील मोंढे वस्तीवर ही घटना घडली.
    मोंढे वस्तीवर शेतात मोरे कुटुंबीयांचे घर आहे. आसपासच्या घरांना बाहेरून कडय़ा लावून दरोडेखोर मोरे यांच्या घरात शिरले. यावेळी आवाजाने जाग आलेल्या कुटुंबीयांना हत्यारांच्या सहाय्याने दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली. त्यात राजश्री मोरे (३५), त्यांचा मुलगा अनुज मोरे (१०) यांचा मृत्यू झाला, तर सासरे एकनाथ मोरे (६५) आणि सासू हिराबाई एकनाथ मोरे (६०) हे गंभीर जखमी झाले. संपत मोरे हे काही कामानिमित्त बाहेर गेले असल्याने ते घरात नव्हते. मध्यरात्री घडलेल्या या घटनेची सकाळपर्यंत कोणाला माहिती नव्हती. सकाळी प्रकार उघडकीस आला. दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील काही दागिने लंपास केल्याचा संशय आहे. घरात मोठी रक्कम नसल्याने त्यांच्या हाती फार काही लागू शकले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.