सांगली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या तरुणाचा पाठलाग करुन खून करण्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी वसंतदादा साखर कारखाना परिसरात घडला. याप्रकरणी तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. राजवर्धन राम पाटील (वय १८ रा. मतकुणकी ता.तासगाव) याच्यावर पाळत ठेऊन कारखान्याच्या प्रवेशद्वारावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला. यातून बचावासाठी तो पळून जात असताना पाठलाग करीत धारदार हत्याराने वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय क्षिरसागर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काल रागाने बघण्यावरुन काही तरुणाशी वाद झाल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.