अहिल्यानगर: महापालिकेची प्रभाग रचना करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ नये, पारदर्शक पक्षपातविरहित प्रभाग रचना निवडणूक आयोग व राज्य शासनाच्या निर्देशानुसारच पार पडली जावी, अन्यथा प्रभाग रचना अवैध ठरू शकते व निवडणूक प्रक्रियेला विलंब लागू शकतो व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकते, असा इशारा खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात दिला आहे.

माजी महापौर अभिषेक कळमकर व दीप चव्हाण, ठाकरे गटाचे गिरीश जाधव, युवा सेनेचे विक्रम राठोड, योगीराज गाडे, कॉंग्रेसच्या नलीनी गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, नगरविकास विभागाने ड वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार हे निर्देश लागू केले आहेत. सन २०१८ मध्ये नगर मनपासाठी याच मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभाग रचना करण्यात आली.

सन २०११ ची जनगणना, भौगोलिक सलगता, प्रभागाची सरासरी लोकसंख्या दहा टक्क्यांच्या मर्यादेत ठेवून रचना करण्यात आली होती. त्यामुळे ती नियमबद्ध व तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरली होती. आजही तेच मार्गदर्शक तत्वे शासनाने लागू ठेवले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे प्रभाग रचना कायम ठेवणे न्यायास अनुसरून राहील. प्रभाग रचना करताना शासन आदेश, नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भौगोलिक सलगता, नैसर्गिक मर्यादा याचा विचार होणे बंधनकारक आहे. तसेच कोणत्याही प्रगणक गटाची फोड टाळण्यात यावी. प्रभागांचे आरक्षण, सदस्य संख्या व त्याचे गुणोत्तरही शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निश्चित करावेत. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंग व प्रशासकीय कारवाई होऊ शकते. प्रभाग रचनेतील पक्षपातीपणा टाळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.