शेतकरी – कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्राध्यापक एन.डी. पाटील यांचे आज(१७ जानेवारी) कोल्हापुरात खासगी रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. उद्या (१८ जानेवारी) कोल्हापुरमधील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार ) मैदानावर सकाळी ८ ते २ या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. करोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांचं निधन

तसेच एन.डी.पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. करोनाच्या नियमांमुळे केवळ २० जणांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.

उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं – अजित पवार

“महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं हरपलं आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केलं. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केलं. आमदार म्हणून काम केलं. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचं निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड – सतेज पाटील

“शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेले. ” , अशा भावना राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त करून प्रा. एन डी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सतेज पाटील म्हणाले की, “ समाजाच्या हितासाठी अखेपर्यंत सरांनी रस्त्यावर उतरून लढाई केली. कामगार-शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मोर्चे, आंदोलने करत न्याय भूमिका घेतली. अंधश्रद्धा निर्मूलन, सीमा प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर लढा उभारणारे अभ्यासू आणि वैचारिक, कणखर व्यक्तिमत्व आमच्यासाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटक शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हे त्यांनी कृतीतून करून दाखविले. सर आज आमच्यात नाहीत ही भावना वेदनादायी आहे. आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! ”

एका युगाचा अंत झाला – प्रसाद कुलकर्णी

“एन.डी.सर गेले एका युगाचा अंत झाला. एन.डी. सर समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली छत्तीस वर्षे मी प्रबोधिनीचे काम करत आहे. सरांच्या लेखनातील,भाषणातील प्रत्येक वाक्य शिकण्यासारखे असायचे. एवढेच नव्हे तर त्यांचे सानिध्यही मोठी शिकवण देत होते. त्यांच्या विषयीच्या शेकडो आठवणी आहेत. त्यांना माझ्या सातत्यपूर्ण कामाबद्दल असलेला विश्वास,खात्री,जिव्हाळा आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांपैकी एक अशी गेली अनेक वर्षे माझी सर्वदूर असलेली ओळख ही माझी फार मोठी कमाई होती.अलीकडे सरांना विस्मरण व्हायचे.त्यांना माणसे ओळखू येत नसत .पण त्याही वेळी ते मला ओळखत असत.त्यावेळी अनेकदा डोळ्यात आलेलं पाणी लपवू शकलो नव्हतो. गेल्या चवेचाळीस वर्षात समाजवादी प्रबोधिनीच्या अगणित कार्यक्रमांना एन.डी.सरांनी मार्गदर्शन केले. समाजवादी प्रबोधिनीचा कार्यक्रम हा त्यांच्या नेहमीच अग्रक्रमाचा विषय होता. सरांना कार्यक्रमासाठी फोन केला आणि सरांनी नाही म्हटले असे कधीही झाले नाही. शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ? पश्चिम जर्मनीतील समाजवादी लोकजीवन, अपेक्षित महात्मा विठ्ठल रामजी शिंदे आदी एन.डी.सरांनी लिहिलेल्या पुस्तिका सर्वप्रथम समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केल्या होत्या.सतत फिरती आणि कमालीची व्यस्तता असूनही सरांचा समाजवादी प्रबोधिनीसाठीचा अग्रक्रम हा माझ्यासाठी व प्रबोधिनीच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी होता.” असे इचलकरंजीमधील समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव म्हणाले आहेत.

तसेच, “महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.डॉ.एन.डी. पाटील.अथक परिश्रम करणाऱ्या सरांच्या शब्दकोशात थकणे हा शब्दच नव्हता.अविश्रांत वाटचाल आणि एन.डी. हे समानार्थी शब्द आहेत.त्यांच्या जाण्याने समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांपैकी अखेरचा व सर्वात बुलंद आवाज प्रबोधिनीने गमावला आहे.त्यांचे विचारकार्य अधिक जोमाने करीत राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.समाजवादी प्रबोधिनी परिवाराची त्यांना विनम्र आदरांजली.” अशा शब्दांमध्ये त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: N d patils funeral will be held tomorrow in the presence of 20 people msr
First published on: 17-01-2022 at 14:08 IST