अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. नऊ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ जागा आल्या. तर भाजपाला तर अवघी एक जागा मिळवता आली. ईश्वरचिठ्ठीने ही जागा भाजपाकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती; जाणून घ्या कोणाला किती जागा?

सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे.

आमदार चंद्रकांत पाटील ठरले किंगमेकर!

शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. बोदवड नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार वाद रंगला होता. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. त्यामुळे बोदवड नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर या ठिकाणी शिवसेनेने बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

“सत्ता असूनही यश मिळवण्यात कमी पडले”; निकालानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “ही लढत मुंडे विरुद्ध मुंडे…”

खडसेंना होमपीचवर जबर धक्का-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. भाजपा सोडल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सलग ४० वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे खडसेंच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण त्यात त्यांना अपयश आले आहे.

भाजपासाठी चिंतेचा निकाल-

बोदवड नगरपंचायतीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपाच्या वाट्याला अवघी एक जागा आली आहे. ईश्वरचिठ्ठीच्या मदतीने भाजपाला ही जागा मिळाली. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा निकाल चिंता वाढवणारा आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचीही या निवडणुकीत कसोटी होती. त्यामुळे गिरीश महाजन याठिकाणी अपयशी ठरल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagar panchayat election result 2022 ncp eknath khadse bodvad nagar panchayat shivsena girish mahajan sgy
First published on: 19-01-2022 at 14:50 IST