गावातील पोलिस दलाच्या आणि शत्रूंच्या हालचालींची सर्वकष माहिती तातडीने चळवळीपर्यत पोहोचविण्यासाठी नक्षलवाद्यांनी १५ वर्षांंच्या आतील मुला-मुलींच्या बालक संघ तयार केला असल्याची धक्कादायक माहिती नक्षलवाद्यांच्या साहित्यातूनच समोर आली आहे. यावरून नक्षलवाद्यांनी बालकांनाही नक्षल चळवळीत सक्रीय करण्याची व्युहरचना तयार केली आहे, हे स्पष्ट होते.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या आक्रमक रणनितीमुळे येथे चळवळ काही प्रमाणात का होईना माघारली आहे. नक्षलवाद्यांना भूसुरूंग स्फोट करून पोलिसांचे बळी घेणे अशक्यप्राय झाल्याचे खुद्द नक्षलवाद्यांनीच मान्य केले आहे, तसेच पोलिसांची स्थानिक पातळीवर काम करणारी गुप्तहेर संघटनाही कमालीची यशस्वी झाल्यामुळेच नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पेरून ठेवलेले भूसुरूंग किंवा आयडी बॉम्ब तातडीने निकामी करण्यात पोलिसांना यश येत आहे, त्यामुळे नक्षलवादी चांगलेच संतापलेले आहेत. नक्षल चळवळीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने नक्षलवाद्यांनी आता विविध पातळ्यांवर काम सुरू केले आहे. पोलिस व नक्षल दलममध्ये व्यंकटपूर येथे झालेल्या चकमकीदरम्यान सापडलेल्या नक्षल साहित्यावरून नक्षलवादी नेते आता चळवळ विस्तारासाठी बालक संघाची निर्मिती करणार असल्याचा उल्लेख यात स्पष्टपणे आहे. नक्षलवाद्यांच्या या बालक निर्मिती संघात दंडकारण्याअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावातील १५ वर्षांआतील मुला-मुलींचा त्यात समावेश करण्याचे स्पष्ट निदेश देण्यात आलेले आहेत. या बालक संघाकडून गावात नक्षल चळवळीचे प्रचार साहित्य वितरित करणे, पोस्टर्स, जाहीर पत्रकाव्दारे प्रचार कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहेत. तसेच खेळ, जननाटय़ मंडळीचे गाणे व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे बालकांना संघटिक करण्यात येणार आहे.

या संघातील बालकांना स्वत: शिक्षण घेत, सोबतच्या मुलांना विविध विषयांचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही या साहित्यातून सुचविण्यात आले आहे, तर गावातील इतर लोकांना संघांनी छोटी छोटी मदत करून त्या संघावर व त्यांच्या कार्यक्रमांवर त्यांचे अभिप्राय जेव्हाचे तेव्हा पार्टीला कळवावे, असेही यात नमूद आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, या बालक संघाला गावातील पोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्रात कशा पध्दतीने पोलिसांचे काम सुरू असते, त्यांचे नियमित दिनचर्येची माहिती गोळा करून नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम सोपविण्यात आले आहे. इतकेच नाही, तर नक्षलवाद्यांचे जे कुणी शत्रू आहेत किंवा गावात दाखल होणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीची माहिती पोहोचविण्याचे काम या बालक संघाला करायचे आहे. नक्षलवाद्यांनी या जिल्ह्य़ातील अतिदुर्गम व दुर्गम भागातील आदिवासी मुलांनाच थेट लक्ष्य केल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे.