Namdeo Shastri On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली. आता या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता सर्व आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणाची सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशी तीन यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावरून गेल्या दीड महिन्यापासून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे.

या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेत गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याबरोबर काय चर्चा झाली? याविषयची माहिती डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केली. “भगवान गड मंत्री धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे”, असंही महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.

नामदेव शास्त्री काय म्हणाले?

“धनंजय मुंडे भेटीला आले होते. त्यांच्याबरोबर आमची दोन तास सविस्तर चर्चा झाली. राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मी त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला. सर्व समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे. तसेच पक्षाचे सर्व नेते त्यांचे बालमित्र आहेत. मग असं असताना आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्यांना गुन्हेगार का ठरवलं जातंय? कारण ते एवढ्या वर्षांपासून आमच्या जवळ आहेत. तसेच ते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. तरीही त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत? जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवण्यात येत आहे असंही मला वाटतंय. यात आमच्या साप्रदायाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जातीयवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी जातीवाद पुन्हा उफाळून आणला आहे”, असं महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.

भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी

महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री माध्यमांशी बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठिशी आहे का? यावर डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं की, “आम्ही धनंजय मुंडे यांच्या भक्कमपणे पाठिशी आहोत. तसेच बीडच्या घटनेत जे गुन्हेगार आहे त्यांचा शोध सुरु आहे”, असं नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.

“मला माध्यमांना असं विचारावसं वाटतं की ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या गावाचा मुद्दा आहे. मात्र, त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. आज ज्यांच्यावर आक्षेप घेतला जात आहे ते नेते खंडणीवर जगणारे नाहीत. गेले जवळपास ५३ दिवस झाले आहेत मीडिया ट्रायल चालवले जात आहेत. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारा माणूस नाही. मात्र, त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांची पार्श्वभूमी तशी नाही”, असंही नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी भगवान गडावर पत्रकार परिषद घेऊन त्यांची ही भूमिका स्पष्ट केली. त्यावर अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “भगवान गड आपल्यासर्वांसाठी पवित्र स्थान आहे. अशा ठिकाणाहून पत्रकार परिषद घेणं आणि अशी पाठराखण केली जावी याचं वाईट वाटलं. आपण कोणीही मंदिरात जातो किंवा अशा पवित्र स्थानी जातो, तिथलं आपलं वागणं वेगळं असतं. पण नामदेव शास्त्रींना कदाचित धनंजय मुंडे यांच्याविषयी माहिती नसावी आणि म्हणून त्यांनी असं विधान केलं. अतिशय आदरपूर्वक मला म्हणावंसं वाटतंय, तुम्हाला एवढी माहिती नसेल तर ती मी तुमच्यापर्यंत पोहोचते. बोलणारे लोक कोणत्याही आकसापोटी बोलत नाहीत. जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवली जात आहे. मी जे धनंजय मुंडेंविरोधात बोललेय, जे तथ्य आहे तेच सांगितलं आहे. अतिशय आदरपूर्वक नामदेव शास्त्रींना सांगावं वाटतं की असं व्हायला नको होतं”, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं नाही.