महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दावे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सातत्याने होत आहेत. त्याचबरोबर भाजपाकडूनही अशी टोलेबाजी अधून मधून होत आहे. कधी लोकसभेच्या जागांवरून, तर कधी वीर सावरकर मुद्यावरून आघाडीत बिनसल्याच्या बातम्या समोर येत असतात. आता पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा आहेत. याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न केला. त्यावर नाना पटोले यांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सारंकाही आलबेल आहे का?

नाना पटोले म्हणाले, मला तुम्हाला (प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी) एक प्रश्न विचारायचा आहे. महाविकास आघाडीतल्या नकारात्मक बातम्या आपल्याला जास्त दाखवल्या जातात. माध्यमांवर तेच जास्त पाहायला मिळतं, अनेकदा त्याचंच जास्त दर्शन घडवलं जातं. परंतु भाजपा आणि शिंदे गटात फार आलबेल आहे का?

नाना पटोले म्हणाले, खरंतर जेव्हा दोन किंवा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा अशा गोष्टी चालतात. परंतु आमची सगळ्यांनीच (महाविकास आघाडी) एक भूमिका घेतली आहे आणि आम्ही पुढे जाणार आहोत. कारण आम्हाला देश वाचवायचा आहे. देशाची सांविधानिक व्यवस्था वाचवायची आहे. काँग्रेसची भूमिका प्रामाणिक आहे. काँग्रेस सर्वात आधी देशाचा आणि संविधानाचा विचार करते. त्यानंतर सत्ता अशी आमची भूमिका आहे. काँग्रेस त्यासाठीच लढत राहिली आहे आणि यापुढेही लढत राहील.

हे ही वाचा >> मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच्या गाठीभेटी वाढण्याचं कारण काय? प्रकाश आंबेडकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोले म्हणाले, या अशा घडामोडी चालत राहणार. परंतु आम्ही तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. एका वृत्तसमूहाने आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल जे सर्वेक्षण केलं आहे. त्यात जनतेने ४३ टक्के कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला आहे. त्यातही काँग्रेस मोठा भाऊ आहे.