हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : काँग्रेस नेते राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीपर्यंत भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. साडे तीन हजार किलोमीटरच्या या यात्रेसाठी देशभरातील १२० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. यात रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. या पदयात्रेतून भारत समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> “मी दहशतवादी आहे का?” ५०० पोलिसांनी गराडा घातल्याचं सांगत सुषमा अंधारेंचा संताप

कन्याकुमारी पासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चार राज्यांचा प्रवास करत तेलंगणात पोहोचली आहे. ५४ दिवसांत १३०० किलोमीटर किलोमीटरचा टप्पा यात्रेनी पुर्ण केला आहे. दररोज यात्रे हजारो कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत असले तरी कन्याकुमारी ते काश्मीर या संपुर्ण भारत यात्रेत केवळ १२० निवडक कार्यकर्त्यांच्या समावेश आहे. जे राहूल गांधी यांच्या समवेत ही संपुर्ण यात्रा पुर्ण करणार आहेत. यात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. देशभरातील ५० हजार कार्यकर्त्यांमधून त्यांची या पदयात्रेसाठी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या त्या राज्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापुर्वी निवडणूक लढवली आहे.   कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा सध्या चार राज्यांचा दौरा करून तेलंगणात दाखल झाली आहे, ५४ दिवसात १ हजार ३०० किलोमीटरचा टप्पा राहुल गांधी यांच्या या भारत जोडो यात्रेनी पूर्ण केला आहे. यात्रेचा हा अनुभव समृद्ध करणार आहे. भारत समजून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. दररोज नवनवीन लोक भेटत आहेत. त्यांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांचे प्रेम आणि पािठबा व्यक्त करत आहेत. हे खूप भारावून टाकणारे असल्याचे नंदा म्हात्रे सांगतात.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये फेब्रुवारी महिन्यात पुन्हा ‘खेला होबे’

दोन मुलींना सोडून पाच महिने घरापासून लांब राहण्याचा निर्णय सोपा नव्हता. पण दोन्ही मुलींनी आणि पतींनी यांनी मला ही संधी सोडू नको असे सांगितले. घरातील सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यामुळे यात्रेत सहभागी होता आले. सुरुवातीचे काही दिवस कठीण गेले. पायात क्रँम्प येते, पायाला फोडे येणे, चालताना त्रास होणे असे प्रकार होत होते. पण नंतर सवय होत गेली.

रोज सकाळी सव्वा पाच वाजता आमचा दिवस सुरू होतो. नाष्ता आणि ध्वजवंदन करून चालायला सुरुवात करतो. सकाळच्या सत्रात  १४ किलोमीटर तर संध्याकाळच्या सत्रात ११ ते १२ किलोमिटर चालतो. यानंतर कँम्प जिथे असेल तिथे वास्तव्याला येतो. इथे ७० कन्टेनरमध्ये आमच्या १२० राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जेवणाची व्यवस्था टेंन्टमध्ये करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आहे. राहुल गांधी हेसुद्धा याच कंन्टेनर हाऊसमध्ये वास्तव्य करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक सामाजिक संस्थाही या यात्रेशी आता जोडल्या गेल्या आहेत. कन्हैया कुमार, योगेंद्र यादव, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील हे देखील यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रा काँग्रेसपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती खऱ्या अर्थाने लोकं, समाज आणि विविध घटकांना जोडणारी झाली आहे, आणि या यात्रेचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे असेही नंदा म्हात्रे सांगत आहेत.