नांदेड : नांदेड विमानतळावरील धावपट्टी खराब आणि धोकादायक झाल्यामुळे तब्बल तीन आठवडे बंद करण्यात आलेली विमानसेवा धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होताच बुधवारपासून सुरू झाली. विमानसेवा सुरू झाल्याने स्थानिक तसेच आसपासच्या जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. या विषयात नांदेडच्या आजी-माजी जिल्हाधिकऱ्यांची महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.
मागील काही महिन्यांपासून नांदेड विमानतळाचे व्यवस्थापन महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे सोपविण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री हे या कंपनीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. गेल्या महिन्यात २२ तारखेपासून या विमानतळावरील सेवा नागरी उड्डाण विभागाच्या संबंधित यंत्रणेने बंद केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही बाब तत्काळ थेट मुख्यमंत्र्यांना कळविली होती. त्यानंतर त्यांनी आपले सचिव व नांदेडचेच माजी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांना आवश्यक त्या सूचना दिल्यामुळे या विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पुढील काही दिवसांतच मार्गी लागले. सुमारे दोन आठवडे त्यासाठी लागले.
मधल्या काळात पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह भाजपाच्या दोन्ही राज्यसभा सदस्यांनी विमानतळावरील सेवा लवकर सुरू करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला. खासदार अजित गोपछडे यांनी संबंधित खात्याच्या दोन्ही मंत्र्यांची भेट घेऊन नांदेड विमानतळावरील विमानसेवा लवकर सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानुसार धावपट्टीची आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण झाल्याचा अहवाल नागरी उड्डयन विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे गेल्यानंतर स्टार एअरलाइन्स कंपनीने या विमानतळावरील आपली सेवा पूर्ववत करण्याची घोषणा मंगळवारी दुपारनंतर केली.
विमानसेवा सुरू होत असल्याची माहिती स्थानिक राज्यसभा सदस्यांच्या यंत्रणांनी समाजमाध्यमांतून जारी केल्यानंतर नांदेड विमानतळावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. अगोदर जाहीर केल्यानुसार बुधवारी बंगळुरूहून निघालेले विमान सकाळी साडेनऊच्या सुमारास नांदेड विमानतळावर सुरळीतपणे उतरले. या विमानातून २० प्रवासी नांदेडमध्ये दाखल झाले. हेच विमान नंतर २९ प्रवाशांना घेऊन अहमदाबादकडे रवाना झाले. विमानसेवा सुरू झाल्यामुळे नांदेडहून दिल्ली, बंगळुुरू, पुणे, हैदराबाद इ. महानगरांमध्ये जाण्याची सोय पुन्हा झाली आहे.
पुढील काही महिन्यांत नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची बाब प्रस्तावित आहे. तूर्त धावपट्टीची दुरुस्ती झाली असली, तरी इतर काही बाबींचीही नजीकच्या काळात पूर्तता करावी लागणार असून अन्य आवश्यक ती कामे टप्प्याटप्प्यामध्ये केली जातील, असे जिल्हाधिकारी कर्डिले यांनी येथे सांगितले. बंद पडलेली विमानसेवा तीन आठवड्यांत पूर्ववत झाल्याच्या बाबीचे श्रेय जिल्हाधिकाऱ्यांना दिले जात आहे. पण त्यांनी आपण आवश्यक ती जबाबदारी पार पाडल्याचे नमूद केले.