नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरळसेवा नोकरभरतीची ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यासाठी निविदा प्रक्रियेत मोठी गडबड झाल्याचे समोर आल्यानंतर संचालक मंडळाने निवड केलेल्या ‘वर्कवेल इन्फोटेक’ या संस्थेला कार्यारंभ देण्याचे आदेश थांबविण्यात आले आहेत.

या बँकेतील प्रस्तावित नोकरभरतीची परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ शासनमान्य-नोंदणीकृत संस्था पुढे आल्या होत्या. यांतील ‘एमकेसीएल’ या नामांकित आणि अमरावती येथील अन्य एका संस्थेचे दर कमी असतानाही नांदेड बँक ‘वर्कवेल’वर प्रसन्न झाली होती. ही बाब ‘लोकसत्ता’ने आवश्यक त्या तपशीलांसह उघड केल्यानंतर बुधवारी दिवसभरात बर्‍याच घडामोडी झाल्या. त्यांतील एकंदर रोख लक्षात आल्यावर ‘वर्कवेल इन्फोटेक’ला पत्र पाठवून कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया थांबल्याची माहिती प्राप्त झाली.

नांदेड बँकेतल्या काही संचालकांनी नोकरभरतीतील हिस्सेदारी ठरविण्यासाठी गेल्या शनिवारच्या सभेदरम्यान चालवलेला ‘बोली बाजार’ आणि त्यात एका ‘प्रतापी’ संचालकाने घेतलेला अधिकचा वाटा (२० जागा) या अनुचित बाबी मुख्यमंत्री कार्यालयातील अत्यंत सचोटीच्या सनदी अधिकार्‍यापर्यंत गेल्यानंतर एकंदर वर्तमान मुख्यमंत्र्यांच्या कानी घालण्यात आले. त्यानंतर नोकरभरतीसंदर्भातील ‘निविदा गडबड’ उघड होताच वरील अधिकार्‍याने आपल्या कचेरीत सहकार विभाग सांभाळणार्‍या आणि नांदेडी राजकीय संस्कृतीशी परिचीत असलेल्या अधिकार्‍यास चौकशी करण्यास सांगितले, आहे.

त्यानंतर या अधिकार्‍याने बुधवारी सकाळी लातूरच्या विभागीय सहनिबंधकांस आवश्यक त्या सूचना दिल्याच; आणि नांदेड बँकेच्या एका अधिकार्‍याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. या दरम्यान विभागीय सहनिबंधकांनी आधी आवश्यक त्या चौकशीसंदर्भात केवळ तोंडी आदेश दिले; पण नंतर त्यांनी जिल्हा उप निबंधकांसह लेखी पत्र पाठवून सविस्तर अहवाल मागविल्यामुळे बँकेच्या मुख्यालयात दिवसभर अस्वस्थता व्यापून राहिली होती.

जिल्हा बँकेच्या मुख्यालयात आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेची पूर्वतयारी चाललेली असतानाच ‘हिस्सेदारी’वरून काही संचालकांनी नेाकरभरती प्रक्रिया संशयास्पद, वादग्रस्त केल्यामुळे चौकशीला सामोरे जाण्याची वेळ बँक प्रशासनावर आली आहे. जिल्हा उप निबंधकांना जी माहिती आणि कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, त्यांची जमवाजमव या प्रशासनाने करून ठेविली असल्याचे सांगण्यात आले.

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील नांदेड जिल्ह्यालगतच्या अहमदपूरचे आहेत. त्यांनी खळखळ न करता बँकेतील नोकरभरतीस मान्यता दिली होती; पण त्यांच्याकडे या विषयाची वकिली करणार्‍या एका संचालकाने भरतीत जास्तीचा वाटा उचलण्याचा खटाटोप केला. त्यांत बड्या राजकीय पदांवरील दोन संचालकांनी या अतिरिक्त वाट्यास समर्थन दिले. ही बाब बँकेवर लक्ष ठेवून असलेल्या प्रभावशाली भाजपा नेत्यास खटकली आहे. भाजपाच्या दोन आमदारांनाही ‘प्रतापा’ने व्यापलेली नोकरभरती नको आहे.