नांदेड : मागील २८ वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे तोट्यात असलेली नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक प्रथमच नफ्यात आली. बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विद्यमान अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सोमवारी त्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नोकर भरती, वेगवेगळ्या संस्थांना कर्ज देताना झालेली अनियमितता यांसह विविध कारणांमुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या २८ वर्षांपासून तोट्यात होती. एनपीएचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते. माजी खासदार भास्करराव पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संचालक मंडळाच्या संमतीने काही कठोर निर्णय घेतले. थकबाकी वसुली करताना बँकेच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, आरबीआय व नाबार्ड यांच्या निकषानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करता यावी यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून बँकेला आता गतवैभव प्राप्त झाले आहे. २८ वर्षांनंतर प्रथमच जिल्हा बँक नफ्यात आली. एनपीएचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटले. वेगवेगळ्या संस्थांकडून दोन कोटी रुपयांची वसुली झाली. शिवाय २५ संस्थांनी पूर्णपणे थकबाकीचा भरणा केला.
माजी खासदार खतगावकर यांच्या पुढाकाराने बँकेच्या कारभारात झालेल्या सुधारणांबद्दल बँकेचे संचालक तथा प्रताप पाटील चिखलीकर, संचालक तथा खासदार रवींद्र चव्हाण, संचालक खासदार नागेश पा. आष्टीकर, माजी आमदार संचालक हनमंत पाटील बेटमोगरेकर व सर्व संचालकांच्या वतीने खतगावकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या चार विभागांच्या वरिष्ठ निरीक्षकांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
बँकेच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर बँकेला गतवैभव प्राप्त होईल. आरबीआय व नाबार्डचे निकष पूर्ण करत असल्यामुळे भविष्यात संस्थेच्या सभासद, शेतकरी यांच्या मागणीप्रमाणे अल्पमुदती, मध्यम मुदती व दीर्घ मुदतीचे वाटप करण्याचे निश्चित झाले. – भास्करराव पाटील खतगावकरअध्यक्ष, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक