नांदेड: नांदेडच्या लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव परिसरात मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या ४८ तासांत एका शेतकरी कुटुंबातील दोन कर्त्यांचा अंत झाला. या कुटुंबातील २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबप्रमुख वडलांचा मृत्यू झाला. त्याचवेळी आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या ४८ तासांत एकाच कुटुंबातील तीन जणांवर नियतीने दारुण हल्ला केल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
राहुल बेदरे (वय २७) आणि भीमराव बेदरे (वय ६०) असे मृत बापलेकाचे नाव आहे. तर शोभाबाई बेदरे यांच्यावर उपचार सुरु आहेत. सावरगाव येथील भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना ४ एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो घरची शेती कसण्यासोबत मोलमजुरी करून वडलांना हातभार लावत होता. सोमवार (९ जून) त्याने दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजंदारीने ट्रकमध्ये कापूस भरण्याचे काम केले. त्यानंतर शेतात जाऊन येतो, असे म्हणून तो गेला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता शेतातील एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे समोर आले.
राहुलच्या आत्महत्याचे कारण अद्याप अधिकृतपणे समोर आले नाही; पण कर्ज आणि आर्थिक विवंचना हे कारण असावे, असे सांगण्यात आले. एकुलत्या एक मुलाने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने वडील भीमराव बेदरे यांना धक्का बसला. मंगळवार (१० जून) रोजी मुलाच्या अंत्यविधीनंतर घरी येताच भीमराव बेदरे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र १२ जूनला पहाटे त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
मुलापाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने शोभाबाई देखील खचून गेल्या. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर लोहा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकीकडे पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या पतीचे अंतीम दर्शनही घेऊ शकल्या नाहीत. गावकऱ्यांनीच काही नातेवाईकांच्या उपस्थितीत भीमराव बेदरे यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अवघ्या ४८ तासांत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.