नांदेड : जिल्ह्यातील तांडा वस्तीसुधार योजनेच्या निधी वितरणाच्या विषयात जिल्ह्यातील दोन आमदारांनी स्वतंत्रपणे केलेल्या तक्रारींना निरर्थक ठरवत पालकमंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर ढकलली. संबंधित आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावे आणि आपले गाऱ्हाणे सांगावे, असे त्यांनी येथे सूचित केले.

पालकमंत्री सावे तब्बल दोन महिन्यांनंतर सोमवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. तत्पूर्वी वरील प्रकरणात भाजपचे डॉ. तुषार राठोड आणि शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर या आमदारांनी केलेली तक्रार माध्यमांमध्ये चर्चेचा विषय झाली होती. आमदार डॉ. तुषार राठोड यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात मंजूर करण्यात आलेली कामे स्थगित करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर त्यांनी मुखेड-कंधार मतदारसंघातील कामांना स्थगिती देऊन संबंधित सचिवांकडून अहवाल मागविला. त्यानंतर शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी, पालकमंत्र्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला, तसेच पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांना सोबत आणून निषेध नोंदविण्याचा इशाराही दिला होता.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सावे यांचा नांदेड दौरा कार्यक्रम रविवारी जारी झाला. त्यानुसार ते सोमवारी सकाळी नांदेडमध्ये दाखल झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहात प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सावे यांनी, विविध विभागांच्या प्रमुखांची विश्रामगृहातच बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, मनपा आयुक्त महेश डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीपूर्वी काही पत्रकारांनी महायुतीच्या दोन आमदारांनी केलेल्या तक्रारींकडे मंत्री सावे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की तक्रार करणाऱ्या आमदारांनी आधी खातरजमा केली पाहिजे. विविध कामांच्या मंजुरीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून आला होता, तो मी मंजूर केला. आमदारांनी आपला प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर सोडवावा.’

सावे यांच्या सोमवारच्या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्यालयात नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले. आमदारांनी केलेल्या तक्रारींमध्ये आपला दोष नाहीच, असे पालकमंत्र्यांनी सूचित केल्यानंतर शिवसेनेचे विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी सावे आणि कोहळीकर यांच्यात समन्वय घडवून आणण्याची भूमिका मांडतानाच सर्व आमदारांना समान न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्री सावे यांनी आपल्या दौऱ्यात एकही अधिकृत बैठक नियोजित केली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. भाजपचे डॉ. संतुक हंबर्डे आणि अमर राजूरकर हेही सोमवारी नांदेडबाहेर होते. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपचे विभाग संघटनमंत्री संजय कौडगे, माजी शहराध्यक्ष चैतन्य देेशमुख व इतर काही कार्यकर्ते विश्रामगृहावर दिसून आले; तर आमदार राजेश पवार यांनी पालकमंत्र्यांची केवळ सदिच्छा भेट घेतली. सायंकाळपर्यंत नांदेडला थांबून पालकमंत्री येथून विमानाने पुण्याला रवाना झाले.