Narayan Rane राज आणि उद्धव ठाकरे हे महापालिका निवडणुकीच्या आधी एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे. ५ जुलैला हे दोघंही मोर्चा काढत आहेत. दरम्यान ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भाष्य केलं आहे. नारायण राणे हे चार दशकांहून अधिक काळ शिवसेनेत होते. शिवसेनेत असताना त्यांना अनेक पदं मिळाली होती. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्रीही केलं होतं. दरम्यान आता त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत वक्तव्य केलं आहे.
नारायण राणेंनी नेमकं काय म्हटलं आहे?
दोन भाऊ एकत्र यावे यासाठी माध्यमांचा इतका गवगवा का केला जातो आहे? एकमेकांच्या घरी या, एकमेकांना जेवू घाला आणि मिठी मारुन एकत्र या. त्यासाठी विषय पाहिजे, मराठी सारखा विषय घ्यायचा. मग त्या विषयावरुन एकत्र येणार, मराठीसाठी मराठी माणसासाठी काहीतरी करतो आहे हे काम केलं जातं आहे. भाऊ-भाऊ एकत्र येतात त्याची चर्चा कशाला करायची? मराठी माणसाचं परिवर्तन ठाकरे बंधू एकत्र येण्याने होईल असं वाटत नाही. कारण याच मंडळींनी मराठी माणूस, नोकऱ्यांचा प्रश्न, गरिबी या बाबत काही करु शकले नाहीत. आता मराठी म्हणून विजयोत्सव करु वगैरे म्हणत आहेत.
उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंना शिवसेनेत राहणं असह्य केलं होतं-नारायण राणे
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना शिवसेनेत राहणं असह्य केलं. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंपुढे कुठला पर्यायच ठेवला नव्हता. आता कशाला मिठ्या मारायची भाषा करत आहेत? मिठी मारायची असेल तर जा राजच्या घरी, त्याला सांगावं उद्धव ठाकरेंनी राज तू आणि मी एक झालो. पाहिजे असेल तर चल मातोश्रीवर परत. हे उद्धव ठाकरे करतील का? नाही करु शकत. राज ठाकरेंनीच जवळीक साधली. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जवळच्या लोकांबाबत फार काही बोलणार नाही. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशा चर्चा आहेत. आधी एकत्र येऊ देत, एकत्र नांदू देत ना. असा टोलाही नारायण राणेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने काही फरक पडणार नाही. तसंच ठाकरे एकत्र आल्याने काही होणार नाही. उद्धव ठाकरेंचे चांगले गुण मला एकही माहीत नाही. त्यांनी वाईट गुणांचं प्रदर्शनच केलं आहे. राज ठाकरे चांगल्याला चांगलं म्हणतात, ते कायमच दुसऱ्याला प्रोत्साहीत करताना दिसतात.
राज ठाकरेंनी जे काही बोलायचं आहे ते बोलावं-नारायण राणे
घरगुती भांडणं चव्हाट्यावर आणणं योग्य नाही. राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावं. उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राहणं असहाय्य्य केलं. राज यांचा एकही निर्णय मान्य केला जात नव्हता. उद्धव ठाकरेंसोबत आज कोणीही नाही. दोन भाऊ एकत्र आले तर मला शब्दात सांगता येत नाही इतका आनंद होतोय. किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिलाय? यासाठी जबादार कोण? हे सोयीचं, फायद्याचं आणि परिवाराच्या स्वार्थाचं राजकारण आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं आहे.

ठाकरे एकत्र आल्याने भाजपाला काहीही फरक पडणार नाही-नारायण राणे
भाजपाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याने कोणताही फरक पडणार नाही, असा दावा नारायण राणे यांनी केला. दोघे एकत्र येण्याने आम्हाला काई धक्का बसणार नाही. आम्ही मराठी नाही का ? आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मराठी माणसासाठी काम केलंय. मला उद्धव ठाकरेंचा एकही चांगला गुण मला माहिती नाही. पण राज ठाकरेंचा स्वभाव रोखठोक आहे. शिवसेनेने अडीच वर्षात सत्ता आणि हिंदुत्व दोन्ही गमावले. राज ठाकरे चुकतायत की नाही, हा माझा प्रश्न नाही. काही हाताशी लागणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.