काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकेचे बाण चालवत रविवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी नवरात्रात राजकीय भूकंप घडवून आणण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नाही तर दसऱ्यापूर्वी सीम्मोलंघन करणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी हे संकेत दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून चांगलीच रंगली आहे. अशात आता राणेंनी नवरात्राचा मुहूर्त शोधल्याची चर्चा सुरू झाली आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये आल्यापासून त्यांनी आजवर अनेकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत.

एकीकडे नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगलेली असतानाच शनिवारी काँग्रेसने सिंधुदूर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्त्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली आणि राणेंना धक्का दिला. यावरून आक्रमक पवित्रा घेतलेल्या नारायण राणे यांनी अशोक चव्हाण हे कुरघोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर काँग्रेसचे अस्तित्व जेवढे कोकणात आहे, तेवढे नांदेडात नाही. नांदेडमध्ये काँग्रेस संपवणारे राज्य कसे काय सांभाळू शकणार? असाही टोला त्यांनी या मुलाखतीत लगावला आहे.

सिंधुदूर्गमधील कार्यकारिणी बदलताना काँग्रेसने मला काहीही विचारले गेले नाही. यापूर्वी मला कोणतीही माहिती न देता कार्यकारिणी रद्द केली आहे. पक्षाच्या कृतीमागे मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण आहेत. या दोघांच्या षडयंत्रामुळे काँग्रेस संपविण्याचे काम सुरू आहे असाही आरोप राणेंनी केला आहे.

महाराष्ट्रात जो माणूस यशस्वी होईल, ज्याला जनता निवडून देते त्याला संपविण्याचे काम काँग्रेसकडून होते आहे. जे लोक काँग्रेसला संपवू पाहात आहेत त्यांना मी त्यांची जागा दाखवून देईन. मी काँग्रेसमध्ये आल्यापासून अशोक चव्हाण आणि मोहन प्रकाश यांना मी नकोय म्हणून ते षडयंत्र करत आहेत.

अशोक चव्हाणांनी महाराष्ट्रात काँग्रेस संपविण्याचे काम हाती घेतले आहे. काँग्रेस सत्तेवर कशी जाईल हे पाहण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र कुरघोडी करणारी मंडळी तेव्हा कुठे होती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. २००५ मध्ये मी काँग्रेसमध्ये आलो. देशपातळीवर काम करायला मिळेल असे वाटले होते. पण माझी सपशेल निराशा झाली. मला देण्यात आलेले एकही आश्वासन काँग्रेसने आजवर पाळलेले नाही. त्यांनी या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच ते यशस्वी पंतप्रधान ठरावेत अशीही अपेक्षाही राणेंनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane criticizes ashok chavan and mohan prakash
First published on: 17-09-2017 at 18:01 IST