उद्योगमंत्री नारायण राणे मंत्रिपदाचा अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत, मात्र येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना जागावाटपात स्थान देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले की, श्री. राणे यांच्याशी आपली चर्चा झाली असून ते काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार नाहीत. त्याचबरोबर मंत्रिपदाचा राजीनामाही देणार नाहीत. राणे यांनी राज्याच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असली तरी आघाडी शासन असताना सर्वाचे सगळेच मान्य करता येत नसते. काही वेळा सामंजस्याने घ्यायला लागते. राणे यांच्या नाराजीबाबत अद्याप आपले बोलणे झालेले नाही त्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्र्यांबाबत मंत्रिमंडळात असंतोष आहे असे म्हणता येणार नाही.
शासन चालवित असताना सर्व आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही, मुख्यमंत्र्यांना सर्वाना बरोबर घेऊन जावे लागत असल्याने तडजोड करावी लागते. मंत्रिमंडळात घडणाऱ्या सर्वच घटना मला सांगता येणार नाहीत, कारण शपथ घेतली असल्याने काही पथ्ये पाळणे भाग आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी सर्वच ठिकाणी मोदी लाट होती, आता ती स्थिती राहिलेली नाही. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. महागाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे राज्यात आघाडीला पुन्हा सत्ता मिळेल. जागा वाटपावरून सुरू असलेला संघर्ष तात्कालिक असून जागांची अदलाबदली होऊ शकते. आघाडी झाल्यानंतर निवडणुकीच्या वेळी गमजा करायला गेलो तर त्याची फळे सर्वानाच भोगावी लागतील. आघाडीचे प्रामाणिक काम केले नाही तर दोघेही मरून जातील असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील टंचाई व नसíगक आपत्तीवेळी राज्य शासनाने मदतीसाठी १३ हजार ३२४ कोटीचा निधी खर्च केला असून यामध्ये पाणीपुरवठय़ासाठी १४६८,फळनुकसानीसाठी ६३९६, घरांच्या पडझडीसाठी ९३, अतिवृष्टी नुकसानीसाठी १०५२ आणि गारपीटग्रस्तांना २८१० कोटींची मदत राज्य शासनाने केली असल्याचे डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jul 2014 रोजी प्रकाशित
राणे मंत्रिपद अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत- कदम
उद्योगमंत्री नारायण राणे मंत्रिपदाचा अथवा काँग्रेसचा त्याग करणार नाहीत, मात्र येत्या विधानसभा निवडणुका आघाडीद्वारे लढविताना प्रामाणिकपणे काम केले नाही तर दोघेही मरून जातील असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

First published on: 20-07-2014 at 02:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane no resigned to congress patangrao kadam