गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले असून त्यामध्ये नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत. भाजपाचे ११ संचालक आणि विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आल्यानंतर भाजपानं या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, या विजयानंतर आता लक्ष्य राज्यातली सत्ता असल्याचं देखील विधान करत राणेंनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.

“ज्यांना अक्कल आहे, त्यांना…”

या निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबाबत बोलताना नारायण राणेंनी विरोधी पॅनलवर अर्थात महाविकास आघाडीवर खोचक शब्दांत निशाणा साधला. “भाजपाची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला”, असं राणे म्हणाले. “विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे”, असं नारायण राणे यावेळी म्हणाले.

सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला मोठा धक्का; जिल्हा बँक निवडणुकीत नारायण राणेंच्या पॅनलचे वर्चस्व

“नको असलेले चेहरे…”

दरम्यान, जिल्हा बँकेतील या मोठ्या विजयानंतर आता पुढील नियोजन काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच नारायण राणे यांनी राज्यातील सरकारकडे रोख करत “आता यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं आहे”, असं राणे म्हणाले. “आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. तिन्ही जिल्ह्यात ज्या काही विधानसभा होतील, त्यासोबत लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत, अशा लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही”, असा खोचक टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.

राज्याला लगानची टीम नकोय

यावेळी बोलताना नारायण राणेंनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर खोचक शब्दांत टोला लगावला. “आता महाराष्ट्राकडे लक्ष्य म्हणजे तिथे थोडक्यात आमची सत्ता हुकली आहे. राज्याला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. हे राज्य किमान १० वर्ष तरी अधोगतीकडे चाललंय.
आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, लगानची टीम नकोय”, असं राणे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकशांमुळे फरक पडत नाही

“सगळ्यांना पुरून एवढे वर्ष उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलोय. मध्ये थांबलो नाहीये मी. त्यामुळे अशा चौकशांचा मला फरक पडत नाही”, असं नारायण राणे म्हणाले. “अमित शाह यांना इथे घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इथे पोलीस यंत्रणा कशा काम करतात, कोर्ट कचेऱ्या कशा होतात, हे सगळं त्यांना भेटून सांगणार आहे”, असंही राणे म्हणाले.