सांगली पाठोपाठ सोलापुरातील सभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर ताशेरे ओढत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंवर निशाणा साधला.
मोदी म्हणाले, काँग्रेस कुटूंब खुश म्हणजे सुशीलकुमार शिंदेही खुश अशी परिस्थिती आहे. त्यांना येथील जनतेचे काहीच पडलेले नाही. शिंदे सोलापूरचे असूनही येथील पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीत मग, अशा मंत्र्यांचा काय उपयोग? असा सवाल मोदींनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत पवारांनी केवळ महाराष्ट्राला फसवलं आहे आणि काहीच केलेलं नाही, असे मोदी म्हणाले. अजित पवार यांनी पाण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मोदींनी सडेतोड समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अहंकार झाला आहे, त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर अशी निकृष्ट दर्जाची विधाने केली जात आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या आणि महायुतीला विजयी करा, असे आवाहन मोदींनी सोलापूरमध्ये केले.
घराणेशाहीच विकासातील मोठा अडथळा – मोदींची सांगलीतील सभेत टीका
घराणेशाही देशाच्या विकासातील सर्वांत मोठा अडथळा आणि लोकशाही व्यवस्थेचा शत्रू असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी सांगली जिल्ह्यातील घराणेशाहीवर नाव न घेता टीका केली. नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात मोदींनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. एकेकाळी लालबहादूर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला होता. मात्र, आता कॉंग्रेसचा ‘मर किसान, मर जवान’ हाच नारा असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
सांगलीतील भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, हातकणंगलेतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी आणि कोल्हापुरातील संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी सांगलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेला सांगलीतील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासूनच मोदींच्या सभेसाठी गर्दी केली होती.
मोदी म्हणाले, सांगलीमध्ये एकाच घराण्यातील चार पिढ्यांनी राजकारण केले. पण जिल्ह्याचा विकास झालेला नाही. घराणेशाहीमुळे विकासाला अडथळा निर्माण होतो. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. त्यांच्याकाळात शेतकऱयांसाठी बनविण्यात आलेली पाण्याची योजना आजही प्रेरणा घेण्यासारखी आहे. मात्र, कृष्णेसारखी मोठी नदी असूनही सांगली जिल्ह्याचा निम्मा भाग दुष्काळी आहे. त्यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. शेतकऱयांच्या समस्या मिटवायच्या असतील, तर पाण्याचे नियोजन केले पाहिजे. पाण्याचे योग्य नियोजन केले, तर मातीतूनही सोने उगवेल, असेही ते म्हणाले.
लालबहादूर शास्त्रींनी त्यांच्या काळात ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला होता. मात्र, सध्या कॉंग्रेसने आपल्या धोरणांनी ‘मर जवान, मर किसान’ हाच आपला नारा बनविला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी नदी जोडण्याचा संकल्प केला होता. त्यांचे सरकार असते, तर नदी जोडण्याचे काम वेगाने झाले असते आणि दुष्काळाचा सामना करायला लागला नसता असे सांगून मोदी म्हणाले, गुजरातमध्ये नर्मदा एवढी एकच मोठी नदी असूनही आम्ही पाईपलाईनद्वारे कच्छच्या रणापर्यंत पिण्याचे पाणी पोचविले. त्यामुळे तेथील भागाचा विकास झाला. जोपर्यंत गावांचा विकास होणार नाही, तोपर्यंत देश समृद्ध होणार नाही.
राजू शेट्टींचे कौतुक
नरेंद्र मोदींनी आपल्या सभेमध्ये राजू शेट्टी यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. राजू शेट्टी यांनी आपल्या शिट्टीने शरद पवार यांनाही हादरविले असल्याचे सांगत व्हिसलब्लोअर कसा असावा, तर राजू शेट्टींसारखा असावा, असे कौतुकोदगार मोदी यांनी काढले.