सोलापूर : ‘अब की बार चारसौ पार’ असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया आघाडीमुळे घाबरले आहेत. त्यामुळेच रातोरात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली असून काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. केवळ भीतीपोटीच नरेंद्र मोदी ही कट कारस्थाने रचत आहेत, असा आरोप सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

अक्कलकोट तालुक्यात विविध गावांमध्ये सुरू केलेल्या प्रचार सभांमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर याच तालुक्यातील प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा सैफनमुल्क चिश्ती दर्गाहमध्ये त्यांनी दर्शन घेतले. तोळणूर, उडगी, सातनदुधनी, तळेवाड, बबलाद, सिन्नूर, दुधनी तांडा, मुगळी, इब्राहीमपूर, हत्तीकणबस, चिक्कळ्ळी आदी गावांमध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला. सायंकाळी सलगर येथे जाहीर सभा घेतली. त्यांच्या सोबत माजी गृहराज्य राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे उपस्थित होते.

हेही वाचा – वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे

हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद

हेही वाचा – बडे नेते माझ्यासोबत असल्याने बाजू उजवी; यश निश्चितपणे मिळणार; संजय मंडलिक यांचा दावा

या निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते हे दोन्ही उमेदवार परस्परांवर टीकांची फैरी झाडत आहेत. परंतु अक्कलकोट तालुक्यातील प्रचारात आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात टीकेचा ब्र शब्दही काढला नाही. स्थानिक विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.