जिल्ह्यात थंडीचा जोर सध्या वाढला असून गार वा-यामुळे दिवसभर गारवा चांगलाच जाणवत आहे. शहराचे तापमान आज (दि.४) ७.९ इतके नोंदवले गेले असून थंडीचा जोर वाढू लागला आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे तापमान आज ६.२ अंशांपर्यंत घसरल्याने नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या १० डिसेंबर रोजी शहराचे तापमान ७.५ इतके कमी होते. तर काल (दि.३) रोजी ८.८ असे होते. निफाडला १० डिसेंबर रोजी ६.४ तर काल (दि.३) ७.२ इतके तापमान असल्याने तिथेही गारवा कायम आहे. वातावरणातील गारव्यामुळे जिल्ह्यात सर्वच दवाखान्यामध्ये सर्दी, ताप व खोकला असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासून तापमान ७ अंशापर्यंत गेल्याने नाशिककरांना बोचऱ्या थंडीला तोंड द्यावे लागत आहे. शहरी व ग्रामीण भागात ठिकठिकाणी सकाळ व संध्याकाळनंतर शेकोट्या पेटवल्या जात असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.