सातारा: पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत उड्डाणपुलाला भगदाड पडलेल्या जागी स्लॅब टाकण्यात आला आहे. उड्डाणपुलाला भगदाड पडल्याने त्या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गीकेवरून वळवण्यात आली आहे. पुलावरील भगदाड पडलेल्या ठिकाणचा स्लॅब ढासळला होता. समाज माध्यमांवर याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या भागावर स्लॅब टाकला आहे. त्याठिकाणी डांबरीकरणासह अन्य कामे झाल्यावर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
सातारा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या उड्डाणपुलावर (अजंठा चौकात) स्लॅब ढासळून भगदाड पडलेले होते. या मार्गावरून नियमित दिवस-रात्र मोठी वाहतूक सुरू असते. या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला होता, यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्लॅब ढासळलेल्या ठिकाणी तत्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांनी केली होती. वाहतूक सुरू राहिली असती तर या पुलाला मोठे नुकसान झाले असते. याशिवाय दुर्घटनाही घडण्याचा धोका होता. यामुळे ही बाब लक्षात येताच या मार्गिकेवरील वाहतूक बंद करण्यात आली. कोल्हापूर कराडहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गे पुण्याकडे वळवण्यात आली. या पुलावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्लॅब टाकला आहे. स्लॅब ढासळल्यामुळे महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सनियंत्रण समितीच्या बैठकीतही अशासकीय सदस्यांनी या बातमीचा संदर्भ देत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनाही पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा करण्यात आली होती.
या उड्डाणपुलाच्या खालील भागात पालिकेने उड्डाणपुलाचे सुशोभिकरण केले आहे. अत्यंत आकर्षक लष्करी साहित्य व त्याच्या प्रतिकृती मांडून पुलाच्या खालील भागात सौंदर्य निर्माण केले आहे. तर दुसरीकडे पुलाचा दर्जा निकृष्ट आहे. पुलाचा भाग ढासळण्याची दुसरी वेळ आहे. या ठिकाणचा स्लॅब ढासळल्याचे अधिकाऱ्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत होते. उड्डाणपुलाच्या ढासळलेल्या स्लॅबबाबत नाराजी वाढू लागल्यानंतर रात्री उशिरा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. यामुळे तुर्त धोका टळला आहे. या पुलाचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. उड्डाणपुलाचे आयुष्य साधारणतः ५० वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकते, दोन किमी उड्डाणपुलासाठी मोठा खर्च येतो. तरीही पुलाचे स्लॅब ढासळत असेल, तर पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज असल्याची भावना प्रवाशांमधून होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी राहिलेल्या आहेत. पुलाचा स्लॅब कोसळला आहेच, शिवाय पुलापासून काही अंतरावर कामात त्रुटी असल्याने पावसाळ्यात पुलावरून खाली पाण्याचे लोट वाहत असतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी मात्र तक्रारी केल्यानंतरही याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. – प्रवीण धस्के, अशासकीय सदस्य, दिशा सनियंत्रण समिती.