कराड : शहरातील नवीन कृष्णा पुलावर संरक्षक जाळी बसवण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन यांनी दिले. केवळ आश्वासन नको, येत्या १२ तारखेपर्यंत प्रस्ताव तयार करा, अन्यथा रास्ता रोको करणार असल्याचा इशारा या वेळी रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांनी दिला.
कृष्णा व जुन्या कोयना पुलांवरून नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रकार वाढल्याने कृष्णा व कोयना हे दोन्ही पूल म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांचे केंद्र बनले आहे. अलीकडेच एका तरुणीने कृष्णा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याने कृष्णा पुलावरून आत्महत्येचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कृष्णा नदीवरील हा पूल व कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलाला संरक्षक जाळ्या बसवण्याची आग्रही मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी (दि. १२) कृष्णा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा रक्षक संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन यांनी स्वतः पुलाच्या पाहणीसाठी भेट दिली. त्यांनी कृष्णा पुलाची पाहणी केली व नेमकी वस्तुस्थिती जाणून घेतली.
पुलानजीकच्या सखल भागात पाणी साचत असलेल्या भागाची त्यांनी माहितीही घेतली. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी हेही उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. महाजन, नायब तहसीलदार बाबूराव राठोड यांच्या समवेत महाजन, रक्षक प्रतिष्ठानचे मनोज माळी यांची संयुक्त बैठक झाली.
बैठकीत कृष्णा पुलावर संरक्षक जाळ्या बसविण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे लेखी आश्वासन महाजन यांनी दिले. मात्र, केवळ आश्वासन नको १२ ऑगस्टपूर्वी संरक्षक जाळ्यांचा प्रस्ताव तयार करा. अन्यथा, ठरल्याप्रमाणे १२ ऑगस्ट रोजी कृष्णा पुलावर रास्ता रोको करणार असल्याची ताठर भूमिका रक्षक प्रतिष्ठानचे माळी यांनी बैठकीत घेतली. शहरात येणाऱ्या रस्त्यावरील पाणी निचऱ्यासाठी पुलाखालून बंदिस्त गटाराची सोय केली आहे. मात्र, या वाहिनीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा भरल्याने रस्त्यावरील पाणी निचरा होत नाही. परिणामी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे. त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे, असेही या वेळी निदर्शनास आणून देण्यात आले.