सातारा : प्राज्ञ पाठशाळा मंडळ या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘नवभारत-दृश्यकला विशेषांक’ या दिवाळी अंकास मुंबई मराठी पत्रकार संघ आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी सर्वोत्कृष्ठ दिवाळी विशेषांक म्हणून पुरस्कार जहीर केला आहे. वरील दोनही संस्था गेली २४ वर्षे अशा मासिकांना पुरस्कार जाहीर करीत आहेत.
प्राज्ञ पाठशाळा मंडळ, वाई या संस्थेने नवभारत हा दिवाळी अंक जागतिक कीर्तीचे चित्रकार श्री. सुहास बहुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला असून, या दिवाळी अंकात वाई शहरातील व अन्य ठिकाणच्या असंख्य रंगीत चित्रांचा समावेश करण्यात आला आहे. नवभारत हे मासिक वैचारिक स्वरूपाचे लेख प्रसिद्ध करीत असते. या अंकाची फार मोठी परंपरा असून, १९४७ साली शंकरराव देव यांनी नवभारत या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. त्यावेळच्या संपादक मंडळामध्ये शंकरराव देव, आचार्य जावडेकर, आचार्य स. ज. भागवत. हरी कृष्ण मोहनी आदींचा समावेश होता. या लोकांनी लिहिलेले त्यावेळचे लोक देशातील व जगातील राजकारण, समाजकारण, साहित्य, शिक्षण आदी विषयांबद्दलचे आहेत. गेली ७४ वर्षे हा नवभारत अंक नियमितपणे प्रकाशित होत असून, या अंकांवर ६ लोकांनी पीएचडी पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्रातील वैचारिक लेख प्रकाशित करणारे हे एकमेव मासिक आहे.