सातारा : प्राचीन मंदिर व वास्तुरचना आणि पौराणिक कथा असा ठेवा लाभलेल्या भुईंज येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. आज गुरुवारी सकाळी सहा वाजता देवी महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला आणि हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक भक्तांनी महालक्ष्मीचा जयजयकार केला.भुईंज येथे कृष्णा नदीच्या घाटावर असलेले महालक्ष्मी देवीचे मंदिर हे आगळ्या वेगळ्या स्थापत्याचा आविष्कार आहे. सध्या नवरात्रानिमत्त मंदिरात उत्सव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच उघडलेल्या पावसानंतर गुरुवारी सकाळी हा किरणोत्सव घडल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.
भुईंज येथील देवी महालक्ष्मी मंदिरात नवरात्रीच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी आणि उत्साह ओसंडून वाहत आहे. यातच गुरुवारपासून सुरू झालेला हा सूर्यकिरणांचा अभिषेक सोहळा सर्वांनाच अलौकिक पर्वणीचा ठेवा ठरत आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे नवरात्रीत पाऊस नसेल तर चौथ्या माळेला सूर्यकिरण महालक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालतात. हा सोहळा पाहण्यासाठी दूरवरून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मागील मे महिन्यापासून सर्वत्र पावसाळा आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश जवळपास नसल्याने यंदा हा किरणोत्सव घडणार का याबद्दल सर्वत्र कुतूहल होते. तरीही गुरुवारी सकाळी भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते. मात्र सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण येण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता पायापासून देवीच्या कपाळापर्यंत देवी सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली. या सोहळ्यानंतर भाविकांनी एकच जल्लोष केला. या वेळी देवीची आरती करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या चौथ्या माळेत देवीच्या भाळी या सूर्यकिरणांनी जेव्हा स्पर्श केला त्यावेळी चैतन्य आणि श्रध्दा यांचा संगम अनुभवण्यास मिळाला.
प्राचीन मंदिरांची रचना वास्तू शास्त्राप्रमाणे असते. त्यामुळे हिंदू तिथी प्रमाणे सूर्यकिरणे येत असतात. भुईंजच्या या मंदिरात देखील नवरात्रीच्या दिवसात सूर्यकिरणे देवीच्या पायापासून मुकुटापर्यंत पोहोचतात. परंतु या काळात पावसाळा असल्याने अनेकदा हा सोहळा घडत नाही. यावेळी दोन दिवसांपूर्वीपर्यंत पाऊस कोसळत होता. मात्र कालपासून उघडीप मिळाली. आज सकाळी काही काळ आकाश निरभ्र झाले आणि किरणोत्सव घडल्याचे भुईंजचे ग्रामस्थ जयवंत पिसाळ यांनी सांगितले.यंदा हा किरणोत्सव घडणार का याबद्दल सर्वत्र कुतूहल होते. तरीही गुरुवारी सकाळी भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित होते. मात्र सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण येण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता पायापासून देवीच्या कपाळापर्यंत देवी सूर्यकिरणांनी न्हाऊन निघाली. या सोहळ्यानंतर भाविकांनी एकच जल्लोष केला.