“देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण…”, नवाब मलिकांकडून हल्लाबोल

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीसांनी भाजपाच्या कार्यकारणी बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडी सरकारवर सडकून टीका केली. यावर आता नवाब मलिक यांनी हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नसल्याचा आरोप केला. तसेच यामागील कारणही सांगितलं. मलिकांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली.

नवाब मलिक आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे. देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही.”

फडणवीस काय म्हणाले होते?

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात हजारो कोटींची लूट सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला काहीच येत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली. तसंच सध्याचं हे सरकार म्हणजे कायद्याचं राज्य नसून काय ते द्या..फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे, असा आरोप केला.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे. आज ज्या प्रकारे वसुली चाललेली आहे, म्हणजे केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत एवढ्यापुरतं हे सीमित नाही. जसा एक वाझे आपण बघितला, तसा प्रत्येक विभागात एक वाझे आहे. आणि ज्याप्रकारे सरकार सामान्यांकरता नाही, तर सरकार जे चाललेलं आहे ते कायद्याचं राज्य नाही, काय ते द्याचं राज्य . फक्त आम्हाला काय मिळणार? आणि आपण जर एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल.”

हेही वाचा : “अनगाईडेड मिसाईलसारखं आवाहन करून…”, अमरावती हिंसाचारावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

“आपल्याला कल्पना असेल गेल्या काही दिवसात काही धाडी पडल्या होत्या आयटी विभागाच्या. त्या धाडीनंतर विभागाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद केलं होतं, कुठे हजार कोटीची दलाली, कुठे पाचशे कोटीची दलाली, कुठे चारशे कोटीची दलाली. हजारो कोटी रुपयांची लूट चालली आहे, वाटमारी चालली आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला कोणी तयार नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nawab malik criticize devendra fadnavis over attacking cm uddhav thackeray pbs

ताज्या बातम्या