गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील योगेंद्र मेश्राम या शिक्षकाच्या हत्येप्रकरणी नक्षलवाद्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे योगेंद्र मेश्राम यांना जीव गमवावा लागला, असे स्पष्ट करत नक्षलवाद्यांनी मेश्राम कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहा दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षलवाद्यांनी योगेंद्र मेश्राम या शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली होती. बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका कस्तुरबा चंदू देवगडे यांचे पती योगेंद्र मेश्राम हे गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. दर शनिवारी ते पत्नीकडे यायचे. १० मार्चला ते ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या(माओवादी) उत्तर गडचिरोली डिव्हीजनल कमिटीचा सचिव पवन याने एक पत्रक जारी केले आहे. “योगेंद्र मेश्राम हे दोषी नव्हते. मेश्राम परिवार आमचा टार्गेट नव्हता. आमच्या गुप्तचर यंत्रणेच्या चुकीमुळे पोलीस समजून मेश्राम यांची हत्या करण्यात आली. ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. मेश्राम कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी असून, आम्ही या घटनेबाबत आपली माफी मागतो. ही घटना आमची चूक व मोठी कमजोरी आहे”, असे पवनने म्हटले आहे. समस्त जनता, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, व्यापारी व पत्रकारांचीही आम्ही माफी मागत असल्याचे पवने पत्रकात म्हटले आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxal killed teacher in gadchiroli later apologise his family
First published on: 20-03-2019 at 15:30 IST