मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असलेल्या नक्षलवाद्यांनी आता देशातील कारागृहात बंदिस्त असलेल्या सहकाऱ्यांनी इतर कैद्यांना चळवळीत दाखल करून घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले आहेत.
देशाच्या मध्य भागात गेल्या तीन दशकांपासून सक्रीय असलेल्या नक्षलवाद्यांना आता चळवळीच्या विस्ताराचे वेध लागले आहेत. यासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद नक्षलवाद्यांनी केली असली तरी या चळवळीला सध्या मनुष्यबळाच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजातून या चळवळीला मिळणारे मनुष्यबळ आता अतिशय कमी झाले आहे. शहरी भागातील तरुण या चळवळीकडे आकर्षित होत असले तरी जंगलात काम करण्याची त्यांची तयारी नाही, असे नक्षलवाद्यांनी राबवलेल्या प्रयोगातूनच सिद्ध झाले आहे. या पाश्र्वभूमीवर आता नक्षलवाद्यांनी आपला मोर्चा देशातील कारागृहांकडे वळवला आहे. या कारागृहांमध्ये हजारो नक्षलवादी सध्या बंदिस्त आहेत. या बंदीवान नक्षलवाद्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मनुष्यबळ मिळवण्याचे धोरण या चळवळीने आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी गोळा केली आहे.
सत्तेचे राजकीय उद्दिष्ट बाळगणाऱ्या नक्षलवाद्यांची स्वतंत्र कारागृह नियमावली (जेल मॅन्युअल) आहे. यानुसार पोलिसांनी एखाद्या नक्षलवाद्याला अटक करून तुरुंगात टाकले की, त्याचे चळवळीतील सदस्यत्व आपोआप स्थगित होते. अशा स्थगित सदस्यांना समर्थक संघटनांनी कशा प्रकारे मदत करावी, याची विस्तृत माहिती या नियमावलीत आहे. कारागृहातून बाहेर आलेल्या नक्षलवाद्याची चौकशी केल्यानंतर त्याला चळवळीकडून पुन्हा सदस्यत्व बहाल केले जाते. आता याच तात्पुरते सदस्यत्व गमावलेल्या बंदिस्त नक्षलवाद्यांकडून चळवळीने मनुष्यबळाची अपेक्षा बाळगली आहे. कारागृहात नक्षलवाद्यांचा इतर कैद्यांशी जवळचा संबंध येतो. हे कैदी विविध आरोपांखाली कारागृहात आलेले असतात. त्यांच्या मनात व्यवस्थेविषयी चीड असते. त्याचा फायदा घेऊन कारागृहातील नक्षलवाद्यांनी अशा कैद्यांना चळवळीकडे आकृष्ट करावे, असे निर्देश आता देण्यात आले आहेत. या कैद्यांचे मतपरिवर्तन झाले, असे लक्षात आल्यावर त्यासंबंधीची माहिती तातडीने चळवळीकडे पोहोचती करावी, तसेच तो कैदी केव्हा सुटणार आहे, याचीही सविस्तर माहिती द्यावी, असे या निर्देशात नमूद करण्यात आले आहे.
कारागृहातील नक्षलवाद्यांना स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येत नाही. इतर कैद्यांसोबत राहणारे नक्षलवादी मनुष्यबळ निर्मितीचे हे काम सहज करू शकतील, या हेतूनेच हे निर्देश देण्यात आले आहेत. कारागृहातील नक्षलवादी नेहमी आंदोलने करत असतात. कारागृह प्रशासनाला नामोहरम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. या आंदोलनात इतर कैद्यांनाही सहभागी करून घेण्यात नक्षलवाद्यांचा पुढाकार असतो. एकूणच कारागृहात असंतोष निर्माण व्हावा, हीच बंदिस्त नक्षलवाद्यांची अपेक्षा असते. आता याच नक्षलवाद्यांनी एक पाऊल पुढे टाकत नवीन सदस्य मिळवण्याची मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, याच नक्षलवाद्यांवर बंदिस्त असलेल्या चळवळीतील इतर सहकाऱ्यांचे मनोधर्य खचणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारीही आहे.