“जावयाप्रमाणे नवाब मलिकसुद्धा ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत का?, याचा महाराष्ट्र सरकारने तपास करावा”

“मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले जात आहेत”

NCB Sameer wankhede vs NCP Nawab Malik
सांगलीमध्ये नबाव मलिकांच्या विरोधात आणि समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ मोर्चा

मुंबईच्या समुद्रामध्ये २ ऑक्टोबर रोजीच्या कारवाईत क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. असं असतानाच सांगलीमध्ये आज समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने मोर्चा काढल्याचं दिसून आलं. यावेळी संस्थेचे पदाधिकारी असणाऱ्या नितीन चौगुले यांनी संस्थेची बाजू मांडताना नवाब मलिक यांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध आहेत का याची मागणी महाराष्ट्र सरकारने करावी अशी मागणी केलीय.

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण
“नवाब मलिकांसारखे जबाबदार मंत्री समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. त्यांच्यावर राजकीय आरोप केले तर समजू शकतो पण त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांवर, वडिलांवर आणि बहिणीवर घाणेरडे आरोप केले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इमानदार अधिकाऱ्याचं खच्चीकरण करण्याचं काम या शासनातील मंत्री करत आहेत,” असं चौगुले यांनी म्हटलं आहे.

गुन्हा दाखल करावा
तसेच पुढे बोलताना, “बाळासाहेब ठाकरे हे मराठी कलाकार, खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असत. आम्हाला मुख्यमंत्री उद्धवजींकडून अपेक्षा आहे की ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्याला ताबडतोब मंत्रीमंडळामधून काढून टाकावं,” अशी मागणीही चौगुले यांनी केलीय. “सरकारी कामात, तपासात हस्तक्षेप केल्याबद्दल कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतोय,” असंही चौगुले म्हणाले.

तपास महाराष्ट्र शासनाने करावा…
“नवाब मलिक यांच्यासारखे मंत्र्यांच्या खात्याचा हा विषय नाही. असं असलं तरी ते रोज उठून एखादी पत्रकार परिषद घेतात आणि त्यामधून उठसूट आरोप करतात. या माध्यमातून तपास भरकटवून ड्रग्ज माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला संशय आहे की त्यांचे जावई ज्या पदार्थाने अंमली पदार्थांच्या प्रकरणामध्ये सापडले. त्याप्रमाणे नवाब मलिक सुद्धा या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आहेत की त्यांचे काही लागेबांधे आहेत की काय याचा तपास महाराष्ट्र शासनाने करावा असं मी आवाहन करतो,” असंही चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.

फासावर लटकवलं पाहिजे
“विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील रेव्ह पार्ट्यांवर अनेकदा कारवाई केलीय. त्याप्रमाणे क्रूझवरील रेव्ह पार्टीवर छापा टाकण्याचं काम समीर वानखेडे यांनी केलं. ड्रग्ज माफियांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे, त्यांना फासावर लटकवलं पाहिजे. देशाचं भविष्य असणाऱ्या तरुणाईला बर्बाद करण्याचं काम हे स्वत:च्या स्वार्थासाठी करत आहेत,” असंही चौगुले यांनी म्हटलं आहे.

आम्ही ठामपणे उभे राहणार
महाराष्ट्रातील तरुण आणि आम्ही समीर वानखेडेसारख्या अधिकाऱ्याच्या पाठीशी उभे राहणार. वानखेडेसारखे जेवढे अधिकारी आहेत महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार, असा शब्द यावेळी चौगुले यांनी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncb sameer wankhede vs ncp nawab malik maharashtra government should have inquiry of minister says shiv pratishthan yuva hindusthan sanghatana scsg