छेडछाडीचा आरोप; गुन्हा दाखल
बीड : मुंबई येथील अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधीक्षक दिनेश चव्हाण यांना परळी येथे रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. हैदराबाद-पुणे रेल्वे गाडीत चव्हाण यांनी गैरवर्तन करत छेड काढल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणात परळी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चव्हाण यांना औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एनसीबीचे अधीक्षक दिनेश चव्हाण हे गुरुवारी रात्री हैद्राबाद-पुणे रेल्वेने प्रवास करत होते. लातूर-परळी मार्गात आपल्याशी चव्हाण यांनी अश्लील वर्तन करून छेड काढल्याचा आरोप तरुणीने दिलेल्या तक्रारीत केला आहे. त्यावरून रेल्वे पोलिसांनी तत्काळ चव्हाण यांना अटक केली. चव्हाण यांना औरंगाबाद मुख्य रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. राज्यात क्रुझवरील पार्टीत अमली पदार्थाचा वापर झाल्याच्या कारणावरून अभिनेता शाहरुख खान याच्या मुलासह काही उद्योगपतींच्या मुलांना पकडण्यात आल्याने एनसीबी चर्चेत असतानाच याच विभागाच्या एका अधिकाऱ्याला छेडछाड प्रकरणी अटक केल्याने राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.