NCP Ajit Pawar On Sthanik Swarajya Sanstha Nivadnuk : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, आजपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत.

दरम्यान आज यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा शिर्डीला पोहचले आहेत. यावेळी वळसे-पाटील यांनी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान सध्या शिर्डी येथे होत असेलेले राष्ट्रवादीचे हे शिबिर सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथे होणार होते. मात्र, अचानक त्यामध्ये बदल करत आता ते शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे.

…अन्यथा स्वबळावर

राष्ट्रवादीच्या या अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनी आज सकाळा सर्वप्रथम साई बाबांचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान माध्यमांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आले.

यावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत. सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल. पण, जर आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढायला तयार आहे.”

बीडमधील घटना गंभीर

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेतेही करत आहेत. तसेच राज्यातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यावरही दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावार बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आरोप करणे योग्य नाही. बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. त्याचबरोबर दोषींना शिक्षाही झाली पाहिजे.”