Prakash Solanke: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरल्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणात वेगळीच चर्चा ऐकायला मिळत आहे. कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला, तर ही जागा कुणाला मिळणार? यावरून ही चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजकीय आरोप होऊ लागल्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. याला त्यांनी प्रकृतीचे कारण दिले होते. मात्र आता कोकाटे आऊट होत असतील तर बीड जिल्ह्यातून कोण ‘इन’ होणार? अशी चर्चा आहे. यातच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळुंखे यांनीही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते, अशा शब्दात त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.
माजी मंत्री प्रकाश सोळुंखे यांनी आज बीडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात प्रवेस होऊ शकतो, असे संकेत अजित पवारांनी दिले असल्याचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “अजित पवारांनी संकेत दिले असतील तर धनंजय मुंडेंना मी शुभेच्छा देईल. पक्षाने त्यांना पालकमंत्रीपद, पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी. धनंजय मुंडे माझ्यापेक्षा लहान आहेत. जिल्ह्यातील आमदार या नात्याने माझे त्यांना आशीर्वाद असतील आणि शुभेच्छा असतील.”
मराठा समाजाला वंचित ठेवलं..
“माझ्या अनुभवानुसार पक्षश्रेष्ठींनी आजवर बीड जिल्ह्यातून ओबीसी आणि मागासवर्गीयांना नेतृत्वात प्राधान्य दिले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा जपत सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पक्ष करत असतो. त्यात काही चुकीचे नाही. पण या पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने पक्षाला ताकद दिली, त्या समाजाला दुर्दैवाने गेली ४५ वर्ष पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे”, अशी खंत प्रकाश सोळुंखे यांनी व्यक्त केली.
माझी जात आडवी येते म्हणून…
प्रकाश सोळुंखे यांच्या नावाची चर्चा असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, माझ्या नावाची चर्चा नेहमीच होत राहते. पण पक्षश्रेष्ठी काय विचार करतात, ते मला माहीत नाही. मंत्रिपदासाठी माजी जात आडवी येत असावी, असेही प्रकाश सोळुंखे यावेळी म्हणाले.
“बीड जिल्ह्याचा ४५ वर्षांचा इतिहास पाहिला तर सुंदरराव सोळुंखे यांच्यानंतर जिल्ह्यातील कोणत्याही मराठा नेत्याला कॅबिनेट किंवा पालकमंत्री पद दिले गेलेले नाही. अनेकवेळा राज्यमंत्री म्हणून संधी दिली. पण राज्यमंत्र्याला फार काही अधिकार नसतात. मराठा समाजाला त्यापेक्षा मोठे पद दिले गेलेले नाही. पक्षाच्या धोरणामुळे मराठा नेते डावलले जात आहेत, ही वस्तूस्थिती आहे”, अशी खंत प्रकाश सोळुंखे यांनी व्यक्त केली.